मात्र अजूनही पर्यायी रस्त्याविषयी संभ्रमावस्था कायम आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यात चर्चा झाल्यानंतर कुंभमेळ्याच्या धर्तीवर तात्पुरता पूल बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, त्यादृष्टीनं अजून तरी कुठलीही कारवाई होत नाही.
बोपखेल येथील रहदारीचा रस्ता वर्षांपूर्वी बंद करण्यात आला. त्यानंतर, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात तरंगता पूल उभारण्यात आला. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव पावसाळ्यात सात जूनपासून तो पूल काढून टाकण्याची भूमिका लष्करानं घेतली. त्यामुळे आता लोकांच्या संतापला सामोरं जावं लागू शकतं.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी सीएमई अर्थात लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाने बोपखेल वासियांसाठी बांधलेला पूल ७ जूनला काढणार असल्याचं कळवलं. त्यानंतर पर्यायी रस्ता सुरु ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांची थेट संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक झाली. त्यात बोपखेल वासियांसाठी पूल उभारण्यात यावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण हा पूल केव्हा उभारला जाणार याबाबत निश्चितता नाही.
एकीकडे पालिका आश्वासन देत असताना लष्कराने सांगितल्याप्रमाणे आज मुळा नदीवरचा तरंगता पूल काढला. त्यामुळे आता बोपखेलवासियांना पुन्हा तब्बल १० ते १५ किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे. त्यामुळे बोपखेल वासिय पुन्हा संतापले आहेत.
दुसरीकडे पालिका नेहमीप्रमाणे बोपखेल वासियांसाठी लष्कराला पालिकेच्या खर्चाने पूल उभा करण्याचा प्रस्ताव दिल्याचं सांगतेय. पण त्याला वेळ किती लागणार हे मात्र पालिकेला सांगता येत नाही.
रस्त्याच्या प्रश्नी गेल्या २१ मे रोजी हिंसक आंदोलन झाल्यानंतरही हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यावर बैठकांवर बैठका होत आहेत. पण तोडगा काही निघालेला नाही. त्यामुळे बोपखेल वासियांच्या दृष्टीने जीवन- मरणाचा प्रश्न असलेल्या या रस्त्याचा प्रश्न सुटणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.