बारामती : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला नेत्या रुपाली पाटील यांनी बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. रुपाली पाटील यांनी आज दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील गोविंदबागेत आज पवार कुटुंबीय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत असताना मनसेच्या रुपाली पाटील यांनीही शरद पवार व अजित पवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी रुपाली पाटील यांनी म्हटलं की, स्वकीयांनी ताकत दिली नसली तरी जी ऊर्जा पवार साहेबांनी दिली, ती प्रेरणादायी आहे. लेक म्हणूण त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. हरता हरता जिंकता येतं हे शरद पवार यांच्याकडून शिकायला मिळालं. मी त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यापूर्वी मी कधी बारामतीमध्ये आले नाही. आजच्या उत्साहातून एक ऊर्जा मिळाली आहे.



या सोहळ्यात माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील प्रथमच सहभागी झाले. यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले की, या वयातही पवार साहेबांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. या वयातही ते प्रत्येक व्यक्तीची भेट घेतात, त्यांची आपुलकीने चौकशी करतात, हे पाहून खूप बरं वाटलं. माझ्यासारख्या तरुणांना साहेबांच्या या कृतीतून खुप काही शिकण्यासारखे आहे.



यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दाखविलेल्या करिष्मामुळे शरद पवारांच्या भेटी घेण्यासाठी बारामतीत नागरिकांनी अलोट गर्दी केली. भेटण्यासाठी आलेल्या सर्वांना पाहून शरद पवारही उत्साही असल्याचे दिसून आलं. नागरिकांची भेट घेण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून रांग लावली होती.


विधानसभा निवडणुकीदरम्यान पवारांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांच्या पायाला पट्टी बांधल्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. त्याही अवस्थेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. अनेक शहरांत जाहीर सभा घेतल्या, रॅली काढल्या, मतदारांशी संवाद साधला. शरद पवारांच्या याच उत्साहाला नमन करण्यासाठी आज बारामतीत अलोट गर्दी लोटली, असंच म्हणावं लागेल.