कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 127 कोटींच्या घोटाळ्यांचे गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्या संदर्भात तक्रार करण्यासाठी आणि आणखी काही घोटाळ्यांची माहिती उघड करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला असतानाही किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत. मात्र मुंबईत राज्य सरकारने केलेल्या कारवाईमुळे एकीकडे भाजप आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या कोल्हापूरला पोहोचले तर राष्ट्रवादी विरुद्ध किरीट सोमय्या हा वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे. 
 
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोल्हापूर स्टेशनवर जमले आहेत. किरीट सोमय्या आणि भाजपला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांचं कोल्हापुरी पायतानानं स्वागत करु असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी किरीट सोमय्या यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. "किरीट सोमय्या कोण रे, पायतान हाना दोन रे", "वेलकम किरीट सोमय्या", "बच्चा बच्चा जानता है, मुश्रीफ साहेब सच्चा है" अशी घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 


Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसून कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना


हसन मुश्रीफांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे- किरीट सोमय्या


किरीट सोमय्या रात्री 8 वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून बसून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहे. कोल्हापूरमध्ये येण्यास बंदी आहे, मग मला मुंबईत का अडवलं जात आहे. कोल्हापूरच्या सीमेवर मला अडवलं पाहिजे. हसन मुश्रीफांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मला चार तास घरात डांबून का ठेवलं? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला. 


किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी मज्जाव


किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सर्व पोलिस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्याने दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता उद्याचा दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती केली आहे. 


किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यामुळे वातावरण विस्कळीत होत आहे- शंभूराजे देसाई


किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यामुळे वातावरण विस्कळीत होत आहे. चुकीच्या पद्धतीने ते वेगवेगळ्या नेत्यांवर ते आरोप करत आहेत. सध्या गणेशोत्सवाचा काळ आहे. पोलीस यंत्रणा आणि इतर यंत्रणा ही त्यात गुंतलेली आहे. अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना कोल्हापूर येथे येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, असं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं.