सांगली : आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीच्या मुद्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या या मुद्यावरून गोपीचंद पडळकर लढा उभा करणार आहेत. यासाठी येत्या 21 सप्टेंबरला एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी आटपाडी तालुक्यातील झरेमध्ये बैठकीचे आयोजन देखील करण्यात आलं आहे. ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुविधा आहेत त्याच एसटी कामगारांना द्या, अन्यथा अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण? असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आता बैलगाडी शर्यतीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी लढा उभारणार आहेत. मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा आहे. माझं राज्य सरकारकडे मागणं आहे की, ज्या सुविधा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतात त्या एसटी कामगारांना द्या, अन्यथा अन्यथा संघर्ष अटळ आहे. येत्या 21 सप्टेंबरला सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथे या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण तिथे जास्त संख्येनं यावं असं आवाहन देखील गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातील प्रवासी आजही एसटीने प्रवास करतात. पण आपल्या सेवेने एसटी महामंडळाला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची ही वेळ यावी. ही राग आणणारी आणि अपमान करणारी बाब आहे. एकतर तुटपुंजा पगार तोही वेळेत मिळत नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्ठींसाठी हजारो कोटींचे टेंडर काढून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जाते. पण कर्मचाऱ्यांचे मुलभूत पगार दिले जात नाहीत. हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय. परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण? या सर्व विरोधात ज्या युनियनने आवाज उठवायला पाहिजे तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.