NCP Protest Against Sadabhau Khot: अभिनेत्री केतकी चितळेला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. सोलापूर येथील सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले. दरम्यान, आपण केतकी चितळेच्या पोस्टचे समर्थन केले नसल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. सदाभाऊ खोत सध्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तिच्याविरोधात ठिकठिकाणी पोलीस तक्रार दाखल केली. काही ठिकाणी पोलिसांनी गुन्हेदेखील दाखल केले आहेत.
अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर सर्वच स्तरांतून तिच्यावर टीका करण्यात आली. महाविकास आघाडीतील पक्षांसह भाजपमधील काही नेत्यांनीही तिला समज दिली आहे. केतकी चितळेनं शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर तिच्या अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. यानंतर तिला अटक करण्यात आली असून सध्या ती पोलीस कोठडीत आहे. मात्र, दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळेला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सदाभाऊ खोत यांनी काय म्हटले?
आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचं समर्थन केलं. त्यांनी म्हटले की, केतकीचा मला अभिमान आहे. केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं ते म्हणाले. स्वतःवर टीका केली की सगळे आठवते. सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का? असा सवालही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली त्यावेळी नैतिकता कुठे होती. अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाला टार्गेट करताच त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का? असंही खोत म्हणाले.c