औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी सभा घेत उत्तर दिलं आहे. मात्र याचवेळी फडणवीस यांनी आपल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर हल्ला चढवला. तर याचवेळी त्यांनी खैरे व्हा भैरे असा टोलाही लगावला होता. त्यामुळे फडणवीसांच्या याच टीकेला आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी उत्तर दिलं आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण अनेकदा औरंगाबादच नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली होती, पण फडणवीस यांनी तसं केलं नाही. त्यामुळे औरंगाबादमध्ये तुमचे एक ज्येष्ठ नेते भैरे आहेत, त्यामुळे मला भैरे करू नका, असा खोचक टोलाही खैरे यांनी फडणवीसांना लगावला. 


यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, मी भैरा नाही, भैरे तुम्ही झाला आहात. फडणवीस मुख्यमंत्री असताना गेली पाच वर्षे अनेकदा मी त्यांना औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली. पण त्यांनी काही केलं नाही. तर मला भैरा नका म्हणू कारण तुमचा एक ज्येष्ठ नेता आमच्या इथं भैरा आहे, असं भाजप नेते हरिभाऊ बागडेंचं नाव न घेता खैरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. 1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर नाव दिले, तेव्हापासून आम्ही संभाजीनगरच म्हणतो असेही खैरे म्हणाले.


फडणवीस खोटारडे..!


फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर बोलताना खैरे म्हणाले की, फडणवीस हे खोटे आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना मी स्वतः अनेकदा त्यांच्याकडे औरंगाबादच्या नामांतराची मागणी केली. त्याबाबत अधिकृत असे पत्रही पाठवले, एवढेच नाही तर हिंदीतून सुद्धा त्यांना पत्र पाठवले. तर त्यावेळी औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर होणारच असं फडणवीस गोड-गोड बोलायचे. पण पाच वर्षात त्यांनी काही नाव बदललं नाही, आणि आज तेच फडणवीस आमच्यावर टीका करतायत हे योग्य नाही, असेही खैरे म्हणाले.


काय म्हणाले होते फडणवीस...!


दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बीकेसी मैदानावर सभेत बोलताना,' आम्ही औरंगाबादला संभाजीनगर म्हणतोय आणि ते आहेच. त्यामुळे नामांतराची गरज काय असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना म्हणाले की, पुन्हा सोनिया गांधींची भाषा,म्हणून मला असे वाटते 'ओ खैरे व्हा आता भैरे, औरंगाबादचा कायमचा झाला कसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.