गडचिरोली : गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. गडचिरोलीच्या सी-60 पथकातील जवान खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. महाराष्ट्र दिनीच नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत मोठा घातपात घडवल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.


गडचिरोलीतील कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ हा भूसुरुंग स्फोट झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचप्रमाणे नक्षलींच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेधही केला आहे.


नक्षलींना चकवण्यासाठी 15 जवान दोन खासगी गाड्यांनी जात होते. मात्र नक्षलींना याविषयी कुणकुण लागल्यामुळे त्यांनी हा हल्ला घडवल्याची शक्यता आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.





एकीकडे, महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना 15 जवानांसोबत ही दुर्दैवी घटना घडली. या बातमीमुळे पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे.


गडचिरोलीतील दादापूर गावात काल मध्यरात्रीच सशस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्याचं काम सुरु असलेल्या भागातील तब्बल 27 वाहनांची जाळपोळ केली होती. संपूर्ण गावभर शासनाविरोधी मजकूर लिहिलेले बॅनर लावून 150 नक्षलींनी 27 वाहनं आणि अन्य यंत्रसामग्री पेटवली होती.


शहीद जवानांची नावे


1. दयानंद ताब्रध्वज शहारे (भंडारा)
2. आग्रमण बक्षी राहाटे (यवतमाळ)
3.सर्जेराव एकनाथ खार्डे (बुलडाणा)
4. किशोर यशवंत बोबाटे (गडचिरोली)
5. संतोष देविदास चव्हाण (हिंगोली)
6. राजू नारायण गायकवाड (बुलडाणा)
7. लक्ष्मण केशव कोडाप (गडचिरोली)
8. शाहुदास बाजीराव मडावी (गडचिरोली)
9. नितीन तिलकचंद घोरमारे (भंडारा)
10. पुरणशाहा प्रतापशाहा दुग्गा (गडचिरोली)
11. प्रमोद महादेवराव भोयर (गडचिरोली)
12. तौशिब आरिफ शेख (बीड)
13. अमृत प्रभुदास भदाडे (नागपूर)
14. योगेश सिताराम हलामी (गडचिरोली)
15. अशोक जितरू वटटी (गडचिरोली)











लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात गडचिरोलीमध्ये मतदान झालं होतं. नक्षलींनी स्थानिक नागरिकांना मतदानावर बहिष्कार घालण्यास बजावलं होतं. मात्र नक्षलींना न जुमानता मतदारांनी भरभरुन मतदान केलं. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत गडचिरोलीमध्ये अधिक प्रमाणात मतदान झालं होतं. याच रागातून नक्षलींनी सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केल्याचं म्हटलं जात आहे.


गेल्याच वर्षी सी 60 पथकाने मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन करुन नक्षल्यांचा खात्मा केला होता. याच रागातून नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याचं दिसत आहे.