गडचिरोली : नक्षल चळवळीतील सर्वोच्च संघटना असलेल्या CPI (Maoist) संघटनेची एकमेव महिला सदस्य असलेल्या नर्मदाक्का हिला पतीसह गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोली पोलीस अथवा राज्याच्या नक्षलविरोधी अभियान कार्यालयाने याला दुजोरा दिलेला नाही. मात्र या दोघांना आठवडाभरापूर्वीच गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन केले गेले असून सध्या त्यांची सविस्तर चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
नर्मदाक्का आपल्या आजारी पतीसह हैदराबाद येथील रुग्णालयात असताना तेलंगणा पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी तिला अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 2012 रोजी तिला दक्षिण गडचिरोलीच्या नक्षल कारवायांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर तिच्या कार्यक्षेत्रात वाढ केली गेली. आदिवासी आणि जनजातीय क्षेत्र-दंडकारण्यातील महिलांना नक्षल चळवळीत दाखल करुन घेण्यात तिचा मोठा हातभार आहे.
पोलिसांविरोधात संघर्ष करण्यासाठी तिने अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज संघटनांतर्गत एका वेगळ्या पथकाची स्थापना देखील केली होती. तिच्यावर जाळपोळ, हत्या, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान अशा हिंसक प्रकरणात एकूण 53 गुन्हे दाखल आहेत. तीन वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा याला नर्मदाक्का व अन्य काही जहाल नेत्यांना रसद पुरविण्याप्रकरणी अटक करण्यात आल्यामुळे ती पुन्हा प्रकाशझोतात आली होती.
याआधी किमान दोनदा तिचा चकमकीत मृत्यू झाल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. महाराष्ट्र पोलिसांनी तिच्यावर 25 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मूळ निवासी असलेली नर्मदाक्का गेली 22 वर्ष भूमिगत राहून हिंसक नक्षली कारवाया करत होती. दरम्यान तिचा पती किरणकुमार चळवळीतील मोठे नाव असून तो दंडकारण्य स्पेशन झोन कमिटीचा सदस्य आहे. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांची थेट जबाबदारी असल्याची माहिती पुढे आली आहे.
किरणकुमारवर महाराष्ट्र सरकारचे 20 लाखाचे बक्षीस ठेवलं आहे. तंत्रज्ञानविषयक अनुभव असलेल्या किरणकुमारवर नक्षल्यांचे मुखपत्र असलेल्या 'प्रभात' मासिकाच्या संपादनाची जबाबदारी होती. तेलंगणा राज्यातील विजयवाडा येथील मूळ रहिवासी असलेल्या किरणकुमारवर नक्षली विचारधारेचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी देखील होती. विशेष म्हणजे 1 मे 2019 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे पोलीस वाहनाला लक्ष्य करत स्फोटाने उडविल्याप्रकरणी कटाचा किरणकुमार मुख्य सूत्रधार असल्याचे समजते.