पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 136 चे काम सध्या सुरु आहे. हे काम छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा गडचिरोलीतील दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयेही आहेत. काल मध्यरात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षलवादी या परिसरात शिरले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधी मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर जवळपास असलेली वाहनं व अन्य यंत्रसामग्री पेटवली.
या आगीत एक कंटेनर लॅब, हायवा ट्रक, डांबर पसरविणारी मशिन, डिझेल व पेट्रोल टँकर अशी एकूण 27 वाहने, जनरेटर व दोन कार्यालये जळाली आहेत. या आगीत 5 ते 10 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
22 एप्रिल रोजी 'कसनासुर कांड'ला एक वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त 22 ते 28 एप्रिल नक्षवाद्यांनी शहीद सप्ताहाचं आव्हान केलं होतं. त्या दरम्यान जिल्ह्यात होणाऱ्या विकास कामाच्या विरोधात ही जाळपोळ करण्यात आली आहे.