Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना वैद्यकीय जामीन (Medical Bail) मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिकांना वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन दिला होता. त्यावेळी मलिकांनी जामीन अर्जात आपल्याला किडनी, लिव्हर, हृदयाशी संबंधित अनेक शारीरिक व्याधी असल्याचं नमूद केलं होतं. आता याप्रकरणी नवाब मलिकांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून कायम करण्यात आला आहे. 


दरम्यान, कुर्ला परिसरातील जमीन विक्रीच्या घोटाळ्यात नवाब मलिकांना ईडीनं अटक केली होती. दिर्घ कारावासानंतर नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला होता. सध्या वैद्यकीय उपचारांसाठी जामीनावर बाहेर आहेत. 


प्रकृतीच्या कारणांमुळे मलिकांना मिळालेला वैद्यकीय जामीन 


नवाब मलिक यांना ईडीनं 2022 मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट 2023 मध्ये ते अटीशर्तींसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचं कारण देत जामीन मिळावा, अशी मागणी तेव्हा त्यांनी केलेली. क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान मलिक चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आरोपी होता. मात्र, एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते.  


मलिक नेमके कोणत्या राष्ट्रवादीत? 


नवाब मलिक यांना गोवावाला कंपाऊंड प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. नवाब मलिक तरुंगात असताना राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडल्या. त्यापैकी एक मोठी घडामोड म्हणजे, नवाब मलिक ज्या पक्षाचा हिस्सा होता. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. अजित दादांनी वेगळा निर्णय घेतला आणि भाजपच्या साथीनं महायुतीत सहभागी झाले. तेव्हापासूनच राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेली. एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट). नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागलेली होती. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. सुरुवातीला त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. नंतर मात्र त्यांनी अजित पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, महायुतीतील नेत्यांनी नवाब मलिकांना जोरदार विरोध केला. यामध्ये प्रामुख्यानं भाजप नेत्यांचा सहभाग होता. त्यामुळे नवाब मलिक नेमके कोणाचे? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.