Nawab Malik : नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला नसला तरी, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर आता कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.


मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी त्यांनी देण्यात आली आहे. परवानगी जरी दिली असली तरी उपचारादरम्यान केवळ  कुटुंबातील एकाच सदस्याला सोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. किडनीच्या त्रासामुळे मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली होती. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल केला होता. अखेर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.


जे. जे. रुग्णालयाऐवजी मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात लवकरात लवकर वैद्यकीय उपचार होणे गरजेचे आहे, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे न्या. राहुल रोकडे यांनी मलिक यांच्या वैद्यकीय अहवालाबरोबरच जे. जे.मध्ये आवश्यक सुविधा आहे की नाहीत, याचा अहवाल देण्याचे निर्देश ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मला मूत्रपिंडाचा आजार असून त्यामुळे पायांना सूज येत आहे. त्याशिवाय अनेक आजार आहेत. मूत्रपिंडाच्या आजारावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरुपी उपचार करण्याची इच्छा असल्याने सहा आठवड्यांपुरता जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज मलिक यांनी केला होता.


दरम्यान, कुर्ला येथील जमीन व्यवहारात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरसोबत झालेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.