मुंबई: राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची अटक चुकीची असल्याचं सांगत राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा नाही असं पक्षाच्या बैठकीत ठरलं आहे. तसेच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीही राष्ट्रवादीच्या या भूमिकेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट झाली आहे.
तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या अटकेनंतर नवाब मलिक यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
अंडरवर्ल्डशी संबंध ठेवणे, त्याच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.
नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. आता नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानण्यात येतंय. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी नवाब मलिक यांचे घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, नवाब मलिक यांना समन्स देण्यात आले नव्हते.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आज मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.