पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नुकतेच आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण केले होते. अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णांवर पैसे घेऊन उपोषणे करतात अशी टीका केली होती. या प्रकरणी नवाब मलिक नमले असून त्यांनी अण्णा हजारे यांची लेखी माफी मागितली आहे.


'आपण वडीलधारी व्यक्ती असून आपले मन दुखावल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो', असे लेखी उत्तर नवाब मलिक यांनी पाठविले आहे. यावर आपल्याला देखील पुढे या प्रकरणी कोणताही वाद वाढवायचा नाही, असे अण्णांनी सांगितले आहे. मलिक यांनी अण्णा हजारे हे 'संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात', असा आरोप केला होता.

मलिक यांनी अण्णांवर पैसे घेऊन उपोषणे करतात अशी टीका केली होती. या प्रकरणी अण्णा हजारे यांनी  मलिक यांना 2 फेब्रुवारी रोजी अॅड. मिलिंद पवार यांच्यावतीने कायदेशीर नोटीस पाठवली होती.  लोकपाल व लोकआयुक्ताच्या नियुक्तीचा कायदा संमत होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिध्दी येथे 30 जानेवारी पासून बेमुदत आमरण उपोषणासाठी यादवबाबा मंदिरात बसले होते.

उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात, अशी बदनामीकारक टीका केली होती. यानंतर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब नवाब मलिक यांनी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल अण्णा हजारे यांची माफी मागून दिलगिरी व्यक्त केली होती. परंतु स्वतः नवाब मलिक यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी कुठलाही खुलासा केलेला नव्हता. यामुळे अण्णा  हजारे यांनी त्यांचे वकील मिलींद  पवार यांच्यावतीने नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.