प्रियांका टीममध्ये उत्तर प्रदेश पूर्वसाठी ज्या तीन जणांची सहप्रभारी म्हणून निवड केली त्यात कोल्हापूरच्या बाजीराव खाडे यांचा समावेश आहे. प्रियांका यांच्या पहिल्या राजकीय जबाबदारीत मराठी माणसाची ही साथ मोलाची ठरणार आहे.
करवीर तालुक्यातील सांगरूळ हे बाजीराव खाडे यांचं गाव आहे. 1996 पासून ते काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. ते राजीव गांधी पंचायत राजमध्ये गेल्या काही वर्षापासून सक्रिय आहेत. आता काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्व विभागाचे प्रभारी सचिव म्हणून खाडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी तेलंगणाचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. गेल्या महिन्यातच त्यांची काँग्रेसच्या जाहीरनामा प्रदेश समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत आहे. खाडे हे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. एमएससी अॅग्री, एमबीए शिक्षण घेतलेले खाडे यांना शासनाने कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरवले आहे. यशवंत बँकेचे संचालक आणि कुंभी कासारी परिसरातील शेतकरी, दूध उत्पादक यांच्या न्यायासाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत खाडे हे प्रियांका गांधी यांच्या टीममध्ये असणार आहेत. या टीममध्ये जुबेर खान आणि कुमार आशिष यांचाही समावेश असणार आहे. खाडे यांना या पदावर पत्र काँग्रेसचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दिले आहे.