मुंबई : आज घटस्थापना, नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजच्याच मुहूर्तावर राज्यभरातल्या मंदिरांची दारं उघडली आहेत. त्यामुळे देवाच्या दर्शनाचा सोहळा याची देही याची डोळा भाविकांना आता अनुभवता येणार आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर आजपासून देवाची मंदिरं भाविकांसाठी खुली झाली आहेत. नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असल्यानं राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी सर्व देव-देवतांच्या मंदिरांना सजावट करण्यात आलीय. उदे गं अंबे उदे... चा जयघोष कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात होतोय तर तिकडे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांनी मंदिराबाहेर रांग लावली आहे. नांदेडच्या माहूरगडावरील रेणुकामाता मंदिरही भाविकांच्या स्वागतासाठी चांगलंच नटलंय. तिकडे सप्तश्रृंगी देवीचा गजरही वणी गडावर पाहायला मिळतोय.
तुळजापूर :
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपल्यानंतर मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास देवीचा पहिला अभिषेक यावेळी पार पडला. आई भवानीला पहिला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीस पारंपरिक वस्त्र आणि अलंकाराने भुषवण्यात आलं.
कोल्हापूर :
उदे गं अंबे उदे... चा जयघोष कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात होतोय.. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्ताने आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. आजपासून देवीचा हा उत्सव सुरु होतोय. या निमित्ताने मंदिर परिसर सजवण्यात आलाय. अंबाबाई मंदिरात घटस्थापना झाली. ही घटस्थापना होताच अंबाबाई मंदिर परिसरातील तोफखान्यावरील तोफ उडवून घटस्थापना झाल्याचा संदेश करवीर नगरीला देण्यात आला. मागील अनेक दशकांपासून कोल्हापुरातील अंबाबाईची ही परंपरा आहे.
माहुरगड रेणुकामाता
नांदेडच्या माहूरगडावरील रेणुकामाता मंदिरही भाविकांच्या स्वागतासाठी सजवण्यात आलंय. मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करु नये, असं आवाहन करण्यात आलंय
नाशिक- वणी
नाशिक- वणीमध्ये आजच्या पूजेपूर्वी रेणुका देवीच्या शृंगाराची मिरवणूक काढण्यात आली..हलगीच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीमुळं वणीचं वातावरण भक्तीमय झालं होतं..
पंढरपूर विठ्ठल मंदिर
राज्यभरातील मंदिर भाविकांसाठी खुली झाली आहेत. घटस्थापनेनिमित्त पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सजलंय.. विठुरायाच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय.. या सजावटीसाठी गुलाब, झेंडू,शेवंती, जरबेरासह विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलं आणि तुळशीपत्रांचा वापर करण्यात आला आहे
एकविरा देवी
आगरी कोळी समाजासह ठाकरे कुटुंबाची कुलदैवता आणि पुण्यातील आई एकविरादेवीचं मंदिरंही खुलं झालंय.