रेणापूरची रेणुकामाता : केवळ विधिवत पूजा रेणुकामाता येथे घटस्थापना
लातूर येथे नवरात्र महोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. अशातच रेणापूर येथील रेणुकामाता येथे सकाळी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. भाविकांच्या अनुपस्थितीत यंदा या नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
रेणापूर येथील रेणुकामाता हे केवळ लातूर जिल्ह्यातील नागरिकांचे नव्हे तर उस्मानाबाद, बीड तसेच कर्नाटक येथील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी भाविकांची रेलचेल, ढोल- तश्यांचा गजर आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने घटस्थापना होत असते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शनिवारी सकाळी विधिवत पूजा करून घटस्थापना करताच मंदिर बंद करण्यात आले होते. नऊ दिवस केवळ पूजा केली जाणार असल्याचे पुजारी श्रीकांत धर्माधिकारी यांनी सांगितले.
हलती दीपमाळ
रेणुकामाता येथील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दगड आणि विटांनी उभारलेली दीपमाळ ही मुळापासून हलते. भाविक या ठिकाणी दाखल होताच आपली मनोकामना व्यक्त करतात आणि या दीपमाळेला हलवतात. त्यामुळे देवीकडे घातलेलं साकडे पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
सप्तशृंगी देवी
आदिमाया आदिशक्तीचा उत्सव सुरू झाला आहे. मात्र, उत्सवाचा उत्साह बघायला मिळत नाही. साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या गडावर भाविकांना प्रवेश नाकारल्याचा फटका स्थानिक व्यवसायिकांना बसला आहे. मात्र, प्रथेप्रमाणे गडावर घटस्थापना करण्यात आली आहे. उत्सवकाळत जिथे जत्रा भरते. आज तिथल्या दुकानांना कुलूप लागलं आहे. परिणामी हजारो कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. सरकारने आता मंदिर उघडावी असे साकडे भाविक देवीलच घालत आहेत.
कोकणवासीयांची कुलस्वामिनी
कोकणवासीयांची कुलस्वामिनी माता योगेश्वरी देवीच्या मंदिरात घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली. अंबाजोगाईचे तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास शनिवारपासून प्रारंभ होत आहे. 17 ते 25 आक्टोबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात यावर्षीचा नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे.
Navratri 2020: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; घटस्थापनेचा शुभ मुहूर्त!
आई तुळजाभवानी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव आज शनिवारी दुपारी घटस्थापनाने झाला आहे. तुळजाभवानी मंदिर प्रशासन व पोलीस विभागाने पूर्ण तयारीसह सज्ज झाले आहे. यंदाचा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असून देवीचे सर्व पूजा धार्मिक विधी व कुलाचार केले जाणार आहेत. तुळजाभवानी मंदिर नवरात्र काळात पूर्णपणे बंद असल्याने पुजारी , मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तुळजापूर शहरात भक्तांना प्रवेशबंदी असून तुळजाभवानी दर्शनासाठी भक्तांनी तुळजापूरात येऊ नये तसेच मंदिर संस्थांच्या वेबसाईटवर देवीचे ऑनलाइन दर्शन घ्यावे असे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. पुजारी व मानकरी यांची कोरोना रॅपिड अँटीजन तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे तर धार्मिक विधीसाठी उपस्थिती संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले.
करवीर निवासिनी अंबाबाई
करवीर निवासिनी अंबाबाई देवीची आजची पूजा 'महाशक्ती कुंडलीनिस्वरूपा' रुपात पूजा बांधण्यात आली आहे. दरवर्षी संपूर्ण देशभरातील भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि नवरात्रोत्सव काळातील विविध रूपातील पूजा पाहण्यासाठी येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश नाही. त्यामुळे भाविकांना ऑनलाईन माध्यमातूनच देवीचे हे देखणे रूप आपल्या डोळ्यात साठवावं लागणार आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या नवरात्रोत्सवात करवीर निवासिनीचे करवीर माहात्म्यातील स्तोत्रांमध्ये होणारे दर्शन ही संकल्पना राबवण्यात आली आहे. सर्व स्तोत्रांमधून करवीर निवासिनीचे व्यापक आणि आदिशक्तीचे स्वरूपच वारंवार प्रकट होताना दिसते. कधी ती शिवाचे संहारकार्य करताना दिसते तर कधी ब्रह्माचे निर्माणकार्यही करताना दिसते तर कधी विष्णूचे पालनकार्यही तिच करते. ब्रह्मा, विष्णू शिवाची ती जननीही आहे आणि आत्मशक्तीही. अशा महाशक्तीची करवीर महात्म्य त्यातील निवडक स्तोत्रे, मूळ संस्कृत संहिता आणि त्यांची मराठी आवृत्ती यास्वरूपातील पूजेच्या निमित्ताने भक्तांच्या समोर पोहोचणार आहे. आजची ही पूजा माधव मुनिश्वर आणि मकरंद मुनिश्वर यांनी बांधली.
श्रीक्षेत्र माहुर गड
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहुरमध्ये आज नवरात्री उत्सावाला सुरुवात झाली. मात्र, कोरोनामुळे सर्वसामान्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
Navratri 2020 | शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; पुण्यातील चतुश्रृंगी देवीच्या मंदिरात घटस्थापना