मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप आमदार गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबई महापालिकेतील भाजपच्या 4 नगरसेवकांनी राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश या चारही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तुर्भे येथील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी अशी या चार नगरसेवकांची नावं आहे.


यावेळी नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले देखील उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेवर आगामी महापौर शिवसेनेचाच होणार आहे. महाविकास आघाडीची ताकद वाढत आहे. गणेश नाईकांची काय अवस्था झाली आहे, यापेक्षा आमची ताकद वाढत आहे हे महत्वाचं असल्याचं विजय चौगुले यांनी म्हटलं.


कार्यकर्त्यांची भावना होती की महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं. म्हणून शिवसेनेत प्रवेश केला आहे. गणेश नाईकांबद्दल काही बोलायचं नाही. आम्ही चार नगरसेवकांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे, इतर नरसेवकांबाबत काही माहिती नाही, असं सुरेश कुलकर्णी यांनी म्हटलं.


सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी व संगिता वास्के यांनी काही दिवसांपूर्वीच आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे आपले राजीनामा सुपूर्द केले होते. तुर्भे येथील एका कार्यक्रमात या नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे निवडणूक जवळ आल्यावर हे चारही नगरसेवक भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. चारही नगरसेवक गणेश नाईक यांच्यासोबत भाजपात आले होते.


नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. गेली अनेक वर्ष महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या गणेश नाईक यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आतापासूनच महाविकास आघाडीमार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.