Navi Mumbai Airport :  राज्यातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. राज्यात मुंबईलगतच असलेल्या नवी मुंबईत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) काम प्रगतीपथावर आहे. बुधवारी, 7 जून रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या विमानतळाच्या जागेची पाहणी केली. या वेळी 2024 डिसेंबरपर्यंत या विमानतळाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होणार आहे हे स्पष्ट केले आहे. 


''नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे'' हा आवाज ऐकण्यासाठी 2024 डिसेंबरपर्यंत सर्वांना वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 2024 डिसेंबर पर्यंत हे विमानतळ पूर्ण होऊन लवकरच या ठिकाणाहून विमान उड्डाण करेल असं स्पष्ट केलं आहे.
 
पनवेलजवळ 1160 हेक्टर जागेवर सोळा हजार कोटी रूपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. 2008 साली या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली होती. सध्या या विमानतळाचे काम जोरात सुरू आहे. या विमानतळाला मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. याचा फायदा आगामी काळात सर्वांना होईल असा दावा सरकारच्यावतीने करण्यात येत आहे.


मुंबई महानगर क्षेत्रातील हे दुसरे अंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. या विमानतळाच्या उभारणीचे कंत्राट जीव्हीके या कंपनीला देण्यात आले होते. त्यानुसार जीव्हीकेने विमानतळाच्या पहिल्या टप्यातील प्रकल्पपूर्व कामांना सुरूवातही केली होती. परंतु ही कामे अंतिम टप्यात असतानाच आर्थिक अडचणीमुळे जीव्हीकेने माघार घेतली. त्यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये नवीन कंत्राटदार म्हणून अदानी समूहाने आपल्या ताब्यात हा प्रकल्प घेत विमानतळ बांधण्यास सुरुवात केलेली आहे. आता याचा काम अंदाजे 35 टक्क्यांपर्यंत पूर्ण होत आले आहे. पुढील काळात हे काम जलद गतीने होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे  


नवी मुंबई आणि पनवेल च्या मध्यभागी जवळपास 24 हजार कोटी खर्च करत हे विमानतळ उभे राहत आहे. वर्षांला 60 लाख प्रवाशी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर करणार आहेत.विमानतळाच्या काही अंतरावर जेएनपीटी बंदर असल्याने याचा मोठा फायदा विमानतळाला होणार आहे. त्यातून वर्षाला 1 लाख 50 हजार मेट्रिक टन कार्गो देश विदेशात जाणार आहे. या विमानतळामुळे 1 लाख थेट तर 2.5 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.


या विमानतळासाठी प्रतीक्षाच प्रतीक्षा ; अनेक डेडलाईन हुकल्या 


-  या विमानतळाला 2008 मध्ये केंद्र सरकारची परवानगी मिळाली.


- त्यानंतर 2012 पर्यंत पहिला टप्या पूर्ण होणे अपेक्षित होते. पण भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसेच आवश्यक विविध प्राधरणांच्या परवानगी आदींसाठी विलंब झाला.


- त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास 2016 ची वाट पाहवी लागली


- अखेर 18  फ्रेब्रुवारी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन 


- त्यानुसार 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळावरून पहिले टेकऑफ होईल, असे त्यावेळी प्रशासनाकडून जाहीर केले होते. परंतु हा मुहूर्तही टळला.


- त्यानंतर 2020 चा मुहूर्त निश्चित करण्यात आला. परंतु हे संपूर्ण वर्ष कोविडविरूध्द लढण्यात गेल्याने विमानाच्या उड्डाणाला पुन्हा ब्रेक लागला.


- त्यानंतर पुन्हा 2022 चा मुहूर्त जाहीर करण्यात आला. परंतु स्थलांतराला ग्रामस्थांचा होत असलेला विरोध, कोरोनाचा संसर्ग व ठेकेदाराची माघार आदी कारणांमुळे विमानतळाच्या कामाला खीळ बसली 


 - त्यानंतर आता 2024 ची नवीन डेडलाईन जाहीर केली आहे.