नवी मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्यानंतर बंद करण्यात आलेल्या एपीएमसीच्या पाच मार्केटपैकी भाजीपाला मसाला आणि धान्य मार्केट सोमवारपासून, तर फळे आणि कांदा बटाटामार्केट येत्या गुरुवारपासून सुरू होणार आहे. मार्केट जरी सुरू होणार असले तरी प्रशासनाने नियम अत्यंत कडक केले आहेत. व्यापाऱ्यांना, ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना स्क्रीनिंग आणि सॅनिटायझिंग नंतरच मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार असून त्यांच्या कार्डवर प्रत्येक दिवशी शिक्के मारले जाणार आहेत. थर्मलगन बरोबर पल्स ऑक्सी मीटरही तपासणीसाठी प्रवेशद्वारावर ठेवण्यात येणार आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 200 पेक्षा जास्त झाल्यानंतर प्रशासनाने सोमवारपासून सर्व मार्केट आठवडाभरासाठी बंद केली होती. बंदच्या कालावधीमध्ये संपूर्ण पाचही मार्केटचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्व मार्केट सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यासाठी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, आमदार शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण, व्यापारी प्रतिनिधी, पोलीस आधिकारी उपस्थित होते.
सर्वच मार्केटमध्ये सोशल डिस्टन्स इनचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे, व्यापाऱ्यांनी कमी माल मागवावा, जास्तीत जास्त व्यवहार हे ऑनलाईन करावेत. प्रवेशद्वारावरच ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची स्क्रीनिंग करावी, ज्यांना ताप आहे. त्यांना मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
...अन्यथा गुन्हे दाखल करणार
नवी मुंबईतील कोरोनाच्या शेकडो रुग्णांचे कनेक्शन हे एपीएमसी मार्केटशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे पुन्हा मार्केट सुरू करताना कडक निर्बंध टाकण्यात आले आहेत. ज्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन केले जाईल त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असा इशारा महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी दिला आहे.
वाहनांची संख्या मर्यादित
सोमवारपासून सुरू होणाऱ्या एपीएमसीच्या तीनही मार्केटमध्ये दररोज येणाऱ्या वाहनांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भाजीपाला मार्केटमध्ये दररोज 150 तर मसाला मार्केटमध्ये 200 गाड्या मालाच्या येणार आहेत. धान्य मार्केटमध्ये मात्र दिवसाआड 300 गाड्यांची आवक होणार आहे. मार्केटमधील व्यापारी, कर्मचारी आणि माथाडी कामगारांचा वैद्यकीय तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे दीड हजार जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. वैद्यकीय तपासणी जे व्यापारी आणि कर्मचारी संशयित आढळून आले आहेत त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
संबंधित बातम्या
- संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
- झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावं; चौथ्या लॉकडाऊनआधी राज्याची केंद्राकडे मागणी
- कोरोना विषाणू कधीच नष्ट न होण्याची शक्यता : जागतिक आरोग्य संघटना
Nirmala Sitharaman | संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के -अर्थमंत्री निर्मला सीतारमण