कणकवली (सिंधुदुर्ग) : रिफायनरी प्रकल्प आता झाला पाहिजे याबाबत शिवसेनेच्या भूमिकेत का बदल झाला? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे केला आहे. बारसूला रिफायनरी नेण्यामागे काही तरी कारणं असतील. राजापूरच्या परिसरातील जागेचे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले होते, त्याचे लागेबंधे शिवसेनेकडे जात होते. त्याअर्थी रिफायनरीसाठी बारसू गावाचा प्रस्ताव ठेवला आहे त्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला. शिवाय जमीन खरेदीत कसे व्यवहार झाले हे सर्व तपासणी करुन सांगेन, असंही नितेश राणे यांनी म्हटलं. कणकवलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला नाणार गाव वगळता इतर गावातून पाठिंबा आहे. त्यामुळे नाणार वगळून लवकरच ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार आहे. शिवसेनेनेही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे," असं नितेश राणे यांनी सांगितलं. "रिफायनरीबाबत पहिल्यापासून शिवसेनेची भूमिका नेहमी बदलत आहे. राज्य सरकारने जी जागा देऊ केली आहे त्या ठिकाणी जुनी जागा आणि आता नवीन उपलब्ध असलेली जागा एकत्र करुन ग्रीन रिफायनरी व्हावी. ग्रीन रिफायनरी बांधायची आहे, माझं घर नाही. नाणार हा भाग वगळला आहे, उर्वरित जागेवर ग्रीन रिफायनरी होऊ शकते. संपूर्ण परिसराचा विकास होत असेल तर का नाही?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.
बारसूतल्या 7/12 मध्ये 'मातोश्री' आहे का ते तपासतो : नितेश राणे
बारसूला रिफायनरी नेण्यामागे काही तरी कारणं असतील. राजापूरच्या परिसरातील जागेचे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले होते, त्याचे लागेबंधे शिवसेनेकडे जात होते. त्याअर्थी रिफायनरीसाठी बारसू गावाचा प्रस्ताव ठेवला आहे त्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे,
यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये उगाच 'मातोश्री' लिहिलेलं नाही. या बारसूतल्या 7/12 मध्ये मातोश्री आहे का ते तपासतो, असा टोला राणेंनी लगावला.
आवाज मांजरीचा वाढला की वाघाचा?
आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे देवगडमध्ये गेले असता त्यांनी सिंधुदुर्गात शिवसेनेचा आवाज वाढल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी हा आवाज मांजरीचा की वाघाचा वाढला अशी मिश्कील टिप्पणी केली.
मला मैदानात ठेऊन दोन हात करा, नितेश राणेंचं शिवसेनेला आव्हान
नगरपंचायत निवडणुकीवरुनही नितेश राणे यांनी शिवसेनेला आव्हान दिलं. "मला बाहेर ठेवून माझा पराभव करणं सोप आहे. मला मैदानात ठेवून माझा पराभव करण्याची हिंमत दाखवली पाहिजे. मी जर मैदानात असतो तर जिल्हा बँकेत चौदाच संचालक निवडून आले असते. त्याचबरोबर माझी देवगड ही जागा हमखास काढली असती. हिंमत असेल तर नितेश राणेला मैदानात ठेवा आणि दोन हात करा. मला मैदानात ठेवून नगरपंचायत काढली असती तर मी मान्य केलं असतं. माझ्या मूडवर आहे की देवगडचे नगराध्यक्ष आणि त्यांचे फोटो कधी तिथून काढायचे," असं राणे म्हणाले.
'शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची सवय'
आदित्य ठाकरे यांनी आपल्या कोकण दौऱ्यात केलेल्या विकासकामांच्या उद्घाटनावरुन नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. राणे म्हणाले की, "वडील नाही तर मुलगा तरी फिरायला लागलाय याचं आम्हाला समाधान आहे. जिल्ह्यानंतर पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आहेत. कोकणाला काहीतरी मिळेल अशा अपेक्षेत इथली जनता आहे. इथल्या हॉटेल मालक आणि पर्यटन व्यावसायिकांबरोबर संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. दोन वर्षांच्या कोरोनाकाळात या लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं, ते कसं भरुन काढणार, त्यांना विशेष पॅकेज देणार नाही. नुसते टोमणे मारत फिरुन उपयोग नाही. काल देवगडमध्ये जाऊन आम्ही सुरु केलेल्या कामांचं उद्घाटन केलं. तसंही शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करायची सवय आहे."