Weather : हवामान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाचा आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या अंदाजाचा देशभरातील शेतकरी आणि मच्छीमारांना फायदा होत असल्याचे मत केंद्रीय मंत्री किरेन रीजिजू (Minister Kiren Rijiju) यांनी व्यक्त केले. गेल्या 9 वर्षात या क्षेत्रात भारताने अधिक चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले. आज महाबळेश्वर येथे ते बोलत होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ढगफुटी आणि भुकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचाही पुरेशा वेळेआधी अचूक अंदाज लावण्यात आपली आश्वासक वाटचाल सुरु आहे.
वेळेआधी धोका समजल्यानं संभाव्य नुकसान टाळता येणार
महाबळेश्वर येथील अति उंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केल्यानंतर रिजीजू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ढगफुटी आणि भुकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचाही पुरेशा वेळेआधी अचूक अंदाज लावण्यात आपली आश्वासक वाटचाल सुरु आहे. नजीकच्या भविष्यात त्या संकटांची देखील पूर्वसूचना देण्यात आपल्याला यश येईल. संभाव्य नुकसान टाळण्यास त्याची मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी स्वदेशी बनावटीची यंत्रणा तयार केली जात असल्याचे रिजीजु म्हणाले.
महाबळेश्वर हे देशातील उत्तम पर्यटन स्थळांपैकी एक
देशातील सर्व पायाभूत सुविधा नैसर्गिक आपत्तीला सक्षमपणे तोड देणाऱ्या असाव्यात यादृष्टीने नियोजन सुरू असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताने पुढाकार घेतला असल्याचे रिजिजू यांनी सांगितले. महाबळेश्वर हे देशातील उत्तम पर्यटन स्थळांपैकी एक असून आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून ते नावारूपाला यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इथल्या स्ट्रॉबेरीच्या उत्पादन वाढीसाठी हवामान विभाग महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न
खेलो इंडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जी क्रीडा संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला त्याचे परिणाम आशियाई स्पर्धेत दिसत असल्याचे ते म्हणाले .तत्पूर्वी आज सकाळी रिजिजू यांनी महाबळेश्वर इथल्या अती उंचावरील मेघ भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केली. हवामानाशी संबंधित महत्त्वाच्या विविध नोंदी आणि ढगांच्या स्वरुपांच्या नोंदींचे नियमितपणे निरीक्षण करण्यासाठी पुण्यातील भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने या प्रयोगशाळेची स्थापना केली आहे. या प्रयोगशाळेत नियमितपणे केली जाणारी निरीक्षणे, ढगांचे सूक्ष्मभौतिकशास्त्र आणि ढग आणि हवेत तरंगणारे कणपुंज यांचा परस्परांशी होणारा संपर्क आणि अवक्षेप संचयन प्रक्रिया आणि संबंधित गतीशीलता विज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने माहिती पुरवत आहेत.
या भेटीदरम्यान रीजिजू यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली आणि त्यांची कार्यप्रणाली जाणून घेतली . केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. जी . पांडिदुराई यांनी त्यांना या प्रयोग शाळेतून सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती दिली .त्यानंतर रीजिजु यांनी केंद्रातील शास्त्रज्ञांशी अनौपचारिक संवाद साधला .