उस्मानाबाद: शेतीसाठी वीजजोडणी देण्यास तब्बल 532 दिवस उशीर करणार्‍या महावितरणला दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला आहे. शेतकर्‍याला एक कोटी रुपये भरपाई देण्याचा आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. प्रतिदिवस सहा हजार रुपये दंड आणि त्यावर नऊ टक्के व्याज याप्रमाणे सुमारे एक कोटीच्या घरात त्रस्त शेतकर्‍याला देण्यात यावी, असे आदेश राष्ट्रीय ग्राहक न्यायमंचाने बजावले आहेत.


उस्मानाबादमधील प्रकाश राऊत या शेतकर्‍याने 2009 पासून त्यासाठी सातत्याने लढा दिला. अखेर राष्ट्रीय ग्राहक न्यायमंचाने महावितरणच्या ढिसाळपणाला दोष देत, शेतकर्‍याला कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश जारी केला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील भिकारसारोळा शिवारात प्रकाश राऊत यांची पंधरा एकर जमीन आहे. लातूर जिल्ह्यातील मुरुड शिवेवर ही जमीन असल्याने त्यांनी लातूर येथील महावितरणकडे 2009 साली अधिकृत डिमांड भरुन वीजेच्या जोडणीची मागणी केली. मात्र महावितरणने त्याकडे साफ दुर्लक्ष करीत तब्बल 532 दिवस उलटून गेले तरीही त्यांना वीजजोडणी दिली नाही.

सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन राऊत यांनी महावितरणच्या कारभाराविरोधात लातूर येथील जिल्हा ग्राहक मंचात दाद मागीतली. जिल्हा ग्राहक मंचाने राऊत यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महावितरण विभागाने राज्य ग्राहक न्यायमंचात त्यांच्याविरोधात अपील केले. तेथेही महावितरणची बाजू फेटाळण्यात आली.

शेतकर्‍याला खोटे ठरविण्यासाठी महावितरण कार्यालयाने अस्तित्वात नसलेल्या 31 नोव्हेंबर 2011 या तारखेला वीजजोडणी दिली असल्याचे न्यायमंचात सांगितले. मात्र नोव्हेंबर महिन्यात 31 तारीखच नसते. महावितरणचा हा सर्व बनाव राष्ट्रीय ग्राहक न्यायमंचासमोर निष्प्रभ ठरला.

शेतकर्‍याला वीजजोडणी देण्यासाठी झालेला उशीर ध्यानात घेऊनस 12 लाख रुपये आणि त्यावर नऊ टक्के व्याज असा पंधरा लाखांचा दंड आणि विलंबापोटी प्रतिदिवस सहा हजार रूपये दंड असा सुमारे कोटीहून अधिक रुपयांची नुकसान भरपाई प्रकाश राऊत यांना त्यामुळे मिळणार आहे.