Aaditya Thackeray : राष्ट्रीय बालहक्क आयोगानं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे. 'आरे वाचवा' आंदोलनात लहान मुलांचा समावेश असल्यानं नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) नियमांची पायमल्ली केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत 3 दिवसात कारवाई करुन आरोपी असणाऱ्यांविरुदध गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आंदोलनात प्रथमदर्शनी बाल न्याय कायद्याच्या कलम 75 चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेनं केली होती.


नेमकं प्रकरण काय?


राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवेसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सह्याद्री राईट्स फोरमच्या वतीने करण्यात आली होती. आरे येथील आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा समावेश केला होता. आदित्य ठाकरे यांनी बाल नाय हक्क संरक्षण कायदा 2015 चे उल्लंघन केले आहे. त्यामुळ त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सह्याद्री राईट्स फोरमच्या वतीने करण्यात आली होती. सह्याद्री राईट्स फोरमनं राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त, राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ईमेल पाठवत कारवाई करण्याची  मागणी केली होती. सह्याद्री राईट्स फोरमने पुरावा म्हणून आदित्य ठाकरे यांचं ट्विट मेलमध्ये टाकले होते. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटमध्ये लहान मुले आंदोलनात सहभागी असल्याचे दिसत आहे. 


दरम्यान, आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी रविवारी काही पर्यावरण प्रेमी संस्थांकडून आंदोलन सुरु होते. त्या आंदोलनात युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाली होते. आदित्य ठाकरेंनी या आंदोलनाचे फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केले होते. आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेल्या फोटोत काही लहान मुलांच्या गळ्यात आरे वाचवाच्या पाट्या लावून त्यांना आंदोलनात सहभागी केल्याचे दिसून आले. लहान मुलांना अशा प्रकारे राजकीय आंदोलनात सहभागी करुन घेता येत नाही. तसेच लहान मुलांना आंदोलनात सहभागी होण्यास भाग पाडणे त्यांच्या मानव अधिकारांचे उल्लंघन आहे, अशी तक्रार सह्याद्री राईट्स फोरम, या संस्थेने राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे दाखल केली आहे. त्यानंतर आज राष्ट्रीय बालहक्क आयोगानं पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली असून आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या: