Nashik News : नाशिकमध्ये आज तब्बल 450 किलो वजन, 16 फूट उंच आणि 12 फूट रुंद असणाऱ्या भव्य मुद्रा चर्चेचा विषय ठरली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील संभाजी महाराज मंडळाने ही भव्यदिव्य कलाकृती साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भव्य मुद्रा राज्यातील पहिली मुद्रा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, सोनेरी इतिहास तळागाळापर्यंत पोहचावा, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर रयतेला स्वराज्य मिळवून देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून तरुणाला प्रेरणा मिळावी या उद्देशाने जयंतीचे औचित्य साधून नाशिकमधील संभाजी मित्र मंडळातर्फे भव्य मुद्रा साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मुद्रेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली आहे.
नाशिक येथील संभाजी महाराज मंडळाचे अध्यक्ष दिनेश चव्हाण संकल्पनेतून हि मुद्रा साकारण्यात आली असून आनंद सोनवणे यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. हि मुद्रा तयार करण्यासाठी फायबर आणि लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. ही मुद्रा 16 फूट उंच आणि 12 फूट रुंद असून वजन 450 किलोच्या आसपास आहे. विशेष म्हणजे या भव्य मुद्रेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली असून त्याचे सर्टिफिकेट मिळाले आहे. नाशिकच्या संभाजी महाराज पुतळ्याजवळ ही भव्य मुद्रा उभारण्यात आली असून शिवप्रेमींसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य त्यांचे पराक्रम आणि त्यांचा प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहचावा या उद्देशाने ही भव्य मुद्रा साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवजयी महाराजांची शिव मुद्रा सर्वांना ज्ञात आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज यांची मुद्रा तळागाळापर्यंत पोहचली पाहिजे, यासाठी आम्ही उपक्रम राबविला आहे.
अमरावती येथे साकारला 1 क्विंटल 24 किलोचा ग्रंथ
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमरावती येथील अजय लेंडे यांनी बुद्धभूषण ग्रंथाचे हस्तलिखित तयार केले आहे. गेल्या चार वर्षांपासून लिहीत असलेला हा ग्रंथ 1 क्विंटल 24 किलोचा असून याची रुंदी 3 फूट आणि लांबी 5 फूट इतकी आहे. या ग्रथांत तब्बल 164 पाने आहेत. हा ग्रंथ 200 वर्षे टिकणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ग्रथांचं प्रत्येक पान हे हस्तलिखित असून पानांची जाळी ही 350 जी एस एम आहे.