नाशिक : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) साजरा करतांना ध्वनी मर्यादा आणि शासन नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वापर करण्यास बंद आहे. यामुळे डीजेचा (DJ) वापर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करता येणार नाही. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट मंडळाला प्रथम क्रमांकाचे 5 लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव सालाबादाप्रमाणे शांततेत पार पाडावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी केले.
यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यासाठी मंडळाकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. यासाठी परवानगी, मंडप उभारणी, डेकोरेशन आदीसंह इतर कामकाजांना सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी महत्वपूर्ण सूचना गणेश मंडळांना दिल्या आहेत. नाशिक पोलिस आयुक्तालयात झालेल्या गणेशमंडळ आणि शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंडप उभारताना वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, मौल्यवान मंडळांनी सुरक्षा रक्षक नियुक्त करावे, आरासमध्ये धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, गणेश मंडळांनी पोलिस आणि मनपाच्या नियमांचे पालन करावे, असा सूचना देण्यात आल्या आहेत. उत्सव सर्वांचा असून शांततेत पार पाडण्याकरिता सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन आयुक्त शिंदेंनी केले.
दरम्यान यंदाही गणेशोत्सव आरास स्पर्धा (Ganeshotsav Competition) आयोजित करण्यात आल्या असून यात 'पर्यावरणपूरक सजावट, ध्वनि प्रदूषण विरहित उत्सव, पाणी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, मुलगी वाचवा अभियान, सामाजिक सलोखा देखावे, स्वातंत्र्य चळवळ, शिवाजी महाराज राज्याभिषेक सजावट, रक्तदान शिबिरांचे आयोजन, सेंद्रीय शेती आदी देखावे सादर करणाऱ्या मंडळांना प्रथम बक्षीस 5 लाख रुपये, द्वितीय 2 लाख 50 हजार, तृतीय 1 लाख तसेच 41 मंडळांना 25 हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नियम पाळल्यास बक्षिसे देखील मिळणार आहेत. त्यामुळे अनेक गणेश मंडळांचा स्पर्धेसाठी चांगली आरास बनविण्याकडे कल असणार आहे.
गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगी
नाशिक महापालिका (Nashik NMC) आणि पोलिसांनी ऑनलाईन परवानगी देण्याची सोय केली आहे. महापालिकेने केलेल्या पोर्टलवर 24 तास ते दोन दिवसात मंडळांना परवानगी दिली जात आहे. मंडळांनी सर्व आवश्यकता कागदपत्रांसह अर्ज केल्यास त्यांना परवानगी दिली जाणार आहे. त्याचबरोबर ध्वनी व वायू प्रदूषण तसेच सार्वजनिक वाहतूक तिला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मंडळांना केले आहे. उत्सव सुरू होण्यापूर्वी सात दिवस अगोदरपर्यंतच महापालिका ऑनलाईन परवानगी देणार आहे. त्यासाठी अर्जदारांनी अर्ज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची यादी मंडपाचा नकाशा पोलिसांची परवानगी वाहतूक पोलिसांची सहमती अग्निशमन दलाचा दाखला या गोष्टींची पूर्तता करणे अनिवार्य करण्यात आली आहे