Nashik news:
नाशिकच्या संदीप यूनिव्हर्सिटीमध्ये सध्या सनहॅक्स 2022 या तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे आहे. यातील सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या समस्येवर त्यांनी हे संशोधन केले आहे. पुण्यातील एमआयटी एडिटी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी हा नवोपक्रम केला आहे. त्यामुळे लवकरच डॉक्टरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन सर्वसामान्य नागरिकांना वाचता येणार आहे. पुण्यातून सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
पुण्यातील सहभागी झालेल्या कॉम्प्युटर सायन्समध्ये शिकत असलेल्या ऋषिकेश नळे, आदित्य पाटील, किरण पाटील आदी विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. हॅकेथॉन मध्ये 36 तास यावर काम करून त्यांनी हे अॅप विकसित केले आहे. आगामी काळात विद्यापीठाकडून अनुदान मिळाल्यानंतर हे अँप पूर्णत्वास येणार आहे.
संदीप यूनिव्हर्सिटीमध्ये आंतराष्ट्रीय हॅकेथॉनचे आयोजन केले असून 26 राज्यांसह सहा देशांतील 2 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना वेब डिझाईन, फिन टेक, हेल्थ टेक आणि मशीन लर्निंग या विषयांवर विविध परीक्षकांकडून समस्या देण्यात आल्या होत्या. यातील हेल्थ टेक या विषयावर 'डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन' या विषयावर सर्वसामान्य नागरिकांना समजेल या भाषेत विकसित करण्यास सांगितले होते. यासाठी जवळपास 36 तास विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या अनुषंगाने काम करीत असताना पुणे येथील एमआयटी एडिटी यूनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी हा नवोपक्रम केला आहे.
सर्व भाषांत विकसित
डॉक्टरांचे पिस्क्रिप्शन या विषयांवर या विद्यार्थ्यांनी काम करताना अनेक बाजूनी विचार करत 'चुझ लाईफ' या अॅपची निर्मितीच्या प्रक्रियेत आहे. या अॅपमध्ये हे प्रिस्क्रिप्शन भारतातील सर्वच भाषांत वाचता येणार आहे. त्यामुळे डॉक्टर, मेडिकल चालकासोबत सर्वसामान्यांना प्रिस्क्रिप्शन वाचता येणार आहे.
जीपीएस, अलार्मसह ऑडिओ प्रिस्क्रिप्शन
अनेकदा रुग्णांना मेडिकल किंवा हॉस्पिटल शोधण्यास अडचणी येतात. या अॅपच्या माध्यमातून सोपे होणार आहे. शिवाय रुग्णांना औषधे घेण्यासाठी वेळच्यावेळी अलार्म व्यवस्था कार्यान्वित केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे कर्णबधीर रुग्णांना देखील ऑडिओ च्या माध्यमातून प्रिस्क्रिप्शन ऐकण्याची सोयही या अँपमध्ये असणार आहे. त्यामुळे एकूणच सर्वांनाच उपयुक्त असणार आहे. सद्यस्थितीत हे अँप प्रगतीपथावर असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.