नाशिक : जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज घोषित झाला असून सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने लाल बावटा फडकवला आहे. दरम्यान, सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. रविवारी 187 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाले.


गेल्या महिन्याभरापासून नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला होता. यंदा डिजिटल प्रचारावर जोर देत युवा उमेदवारांची चलती पाहायला मिळाली. ती निवडणूक निकालानंतरही कायम राहिली. दरम्यान 187 ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाने 51 जागा जिंकत घड्याळाचा दबदबा कायम ठेवला. आदिवासी पट्ट्यात वर्चस्व असलेल्या माकप पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य निवडणुकांत लाल बावट्याची जादू कायम राखली.


जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आदी तालुक्यात अनुक्रमे 61, 69, 58, 05 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. त्यानुसार राष्ट्रवादी 51, माकप 42, ठाकरे गट 23, शिंदे गट 22, भाजप 13, काँग्रेस 09 आणि मनसेने एका जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान या निवडणूक निकालानंतर त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी पट्ट्यात आजही राष्ट्रवादी, माकप, काँग्रेस हे आघाडीचे पक्ष असल्याचे अधोरेखित झाले आहे. तर नव्याने आलेल्या शिंदे गटाने देखील 22 जागा मिळवत सत्तेच्या केंद्रस्थानी असल्याचे दाखवून दिले आहे. 


मनसेने परंपरा कायम राखली! 


इगतपुरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या भावली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तेची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रतनकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलने बाजी मारली. या निवडणुकीत थेट सरपंचपदी लक्ष्मण घोडे निवडून आले. यामुळे तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी आपले खाते उघडल्याचे दिसून आले.


असे आहे नाशिक जिल्ह्यातील पक्षीय बलाबल


राष्ट्रवादी - 51
माकप - 42
ठाकरे गट - 23
शिंदगट - 22
भाजप - 13
काँग्रेस - 09
मनसे - 01
इतर - 33