नाशिकमध्ये गुंडांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड, घरांचंही नुकसान
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 16 May 2017 07:40 AM (IST)
नाशिक : नाशिकमधील पंचवटी परिसरात गुंडांनी सोमवारी रात्री अक्षरश: धुडगूस घातला. 30 ते 40 जणांच्या टोळक्याने रात्री साडेदहाच्या सुमारास पाथरवट लेन ते गजानन चौक परिसरातील 10 ते 12 वाहनांची तोडफोड केली. हातात लाकडी दांडके, तलवारी घेऊन या टोळक्याने वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. तसंच या गुंडांनी काही नागरिकांच्या घरातील सामानांची नासधुस करुन त्यांना मारहाणही केली. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु पोलिस घटनास्थळी दाखल होताच स्थानिकांनी ठिय्या मांडत घटनेचा निषेध व्यक्त केला. सध्या या परिसरात मोठा पोलिसांसह रॅपिड अॅक्शन फोर्सचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकारामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत.