मुंबई : नोटाबंदीनंतर बनावट नोटांचा शोध लावणं सोपं होईल, असा दावा सरकारने केला होता. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे नोटाबंदीनंतर जमा झालेल्या बनावट नोटांची आकडेवारीच नसल्याचं समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारा अंतर्गत ही माहिती समोर आणली आहे.


8 नोव्हेंबर 2016 ते 10 डिसेंबर 2016 पर्यंत रद्द केलेल्या नोटांमधून किती बनावट नोटा मिळाल्या, त्या कोणत्या बँकेतून मिळाल्या, एकूण बनावट नोटा, नोटांचे मूल्य आणि दिनांक याची माहिती दयावी, असा अर्ज अनिल गलगली यांनी केला होता. मात्र आरबीआयकडे सध्या नेमका आकडा नसल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदीच्या भाषणात नोटाबंदीचे फायदे सांगितले, त्यात बनावट नोटा रोखणं हा देखील एक मुद्दा होता. मात्र आरबीआयच्या या उत्तरानंतर बनावट नोटा खरंच नियंत्रणात आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.