नाशिक : सध्या पुणे जिल्ह्याला आलेल्या जोरदार पावसामूळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. दिंडोरीतील पुणेगाव धरण 80 टक्के भरले आहे. या धरणातून 300 क्युसेक्सने नदीपात्रांत पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सध्या जोरदार पाऊस होत आहे. पुणेगाव धरणातून सोडण्यात आलेले पाणी आता ओझरखेड धरणात पोहोचत आहे. एकूणच दिंडोरी तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणे ' ओव्हरफ्लो ' होण्याच्या मार्गावर आहे.


गोदावरी नदी दुथडी भरून


नाशिक जिल्ह्यातील गोदावरीची पूरस्थिती कायम आहे. सध्या येतील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेले आहे. गोदा काठावरील इतर मंदिरांना पाण्याने वेढा घातलाय. गंगापूर धरणातून 8 हजार 100 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावारीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.


कळवण तालुक्यात पावसाची संततधार 


मागील दोन दिवसांपासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू असून या पावसामुळे धनोली धरण पूर्णपणे भरून 'ओव्हरफ्लो ' झाले आहे. धरण भरल्यामुळे सांडव्यामार्गे नदीला पूर आला आहे. नदीकाठी असलेली भात व सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धनोली ते शेपूपाडा या परिसरातील नदीकाठच्या सुमारे 40 ते 50 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या परिसरात पावसाचा जोर वाढत असून नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


केळझर धरण ओव्हरफ्लो


नाशिक जिल्ह्यातील बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले 572 दलघफू क्षमतेचे 'केळझर' धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून आरम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. केळझर मध्यम लघू प्रकल्प परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे केळझर धरण ओसंडून वाहू लागले आहे. बागलाण तालुक्यातील बहुतांशी शेती सिंचनाखाली आणण्यात केळझर धरणाच्या डांगसौंदाणे पाणलोट क्षेत्राचा मोठा फायदा होतो. केळझर धरण भरल्याने आरम खोऱ्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.


सुरगणा तालुक्यात पावसाचे थैमान


नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पावसाने थैमान घातले असून देवमाळ ते अंबडदहाड नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दळणवळणाची सोय बंद झाली आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाणं अशक्य झाले आहे. दवाखान्याची सोय नसल्या कारणाने गर्भवती महिला, आजारी ग्रामस्थ यांना अक्षरशःजीव मुठीत धरून वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नदी ओलांडावी लागत आहे. ही जीवघेणी कसरत नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असून सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धरण ओव्हरफ्लो


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. अक्कलपाडा धरण्यात पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत 6 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून स्थलांतरणाची आवश्यकता भासल्यास पर्याय व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन पथकांनी सर्व साहित्य व साधनांसह अलर्ट राहण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


नाशिक जिल्ह्याला यलो अर्लट


दरम्यान, आज (5 ऑगस्ट) देखील नाशिक जिल्ह्यात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. नाशिकसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. तर सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने ग्रीन अलर्ट दिलाय.  


हेही वाचा :


Maharashtra Breaking 5th August LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...


नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर, 5 गावांचा संपर्क तुटला, गंगापूरसह नांदूरमधमेश्वर धरणातून विसर्ग सुरु


मराठवाड्यातील धरणे भरणार! नाशिक-नगरच्या धरणांमधून मोठा विसर्ग सुरु, जायकवाडीत येणार पाणी; विसर्ग ,पाणीसाठा किती?