नाशिक : सशस्त्र दरोडेखोराला धाडसाने लढा देणाऱ्या नाशिकच्या 'डॅशिंग लेडी'वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशोकनगरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रात कार्यरत सविता मूर्तडक यांनी न घाबरता दरोडेखोराचा प्रतिकार केला. सविता यांनी चोराला दिलेला धाडसी लढा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी बारा दिवसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.


नाशिक शहरात दिवसेंदिवस चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सातपूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली. अशोकनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रात सविता मूर्तडक काम करत होत्या. केंद्रात सविता एकट्याच असल्याची संधी साधत एक शस्त्राधारी दरोडेखोर आला आणि त्याने आतून दाराची कडी लावत सविता यांना धारदार चाकूचा धाक दाखवला.

जीवे मारण्याची धमकी देत कॅश काऊंटरमधील पैसे काढून देण्यास सांगितलं. मात्र याचवेळी घाबरुन न जाता धाडसाने सविता यांनी त्याला नकार देत त्याच्याशी प्रतिकार करायला सुरुवात केली. काऊंटरमधून बळजबरीने पैसे काढत असताना सविता यांनी त्याच्या हाताला चावाही घेतला. यामुळे चिडलेल्या दरोडेखोराने सविता यांना जोरात भिंतीवर आपटत मारहाण केली. सविता यांचा रुद्रावतार बघून शेवटी या केंद्रातील लाखो रुपयांपैकी फक्त 40 हजार रुपये घेत तो फरार झाला.


जखमी झालेल्या सविता यांनी घटनेची माहिती तात्काळ आपल्या पतीला दिली. त्यांनी सातपूर पोलिसांशी संपर्क साधला. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा एकचं पथक घटनास्थळी दाखल झालं. विशेष म्हणजे या केंद्रातीलच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला हा सर्व प्रकार बघून पोलिसांनी आपली सूत्रं हलवण्यास सुरुवात केली.

17 मे रोजी घडलेल्या या घटनेतील आरोपीचा 12 दिवस उलटूनही शोध लागत नव्हता. अखेर बुधवारी रात्री सातपूर परिसरातूनच 28 वर्षीय संग्राम पारखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. विशेष म्हणजे संग्राम हा कोणीही सराईत गुन्हेगार नसून तो सातपूरच्या एका कंपनीत कामगार आहे. त्याने एका ओळखीच्या व्यक्तीकडून काही पैसे उधार घेतले होते. मात्र ते परत करु शकत नसल्याने नाईलाजाने आपण हे केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.

सविता मूर्तडक यांच्यावर सध्या सर्वच स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत असून पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.