नाशिक : शहरामध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असतांनाच दुसरीकडे खासगी हॉस्पिटल्समध्ये बेड्सच शिल्लक नसल्याचं धक्कादायक वास्तव एबीपी माझाच्या रिअलिटी चेकमध्ये समोर आले असून नाशिकमधील आरोग्य यंत्रणाच आता व्हेंटिलेटरवर गेल्याच बघायला मिळतय.


नाशिकमध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला असून रोज रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होते आहे. आठवडाभरातीलच आकडेवारी धडकी भरवणारी असून गेल्या 7 दिवसात तब्बल 23 हजार 132 नव्या कोरोना बाधितांची नोंद झालीय तर 98 कोरोनाग्रस्ताचा मुत्यू झालाय. विशेष म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असून सध्या 24 हजार 250 रुग्णांना उपचाराची गरज आहे. चिंताजनक बाब म्हणजे अनेक तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णाना खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळत नसल्याने त्यांना नाईलाजास्तव होम क्वारंटाईन होण्याची वेळ येत असल्याची शहरात चर्चा आहे. 


जिल्ह्यातल्या नावाजलेल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत, ते कधी उपलब्ध होतील हे सांगू शकत नाही. जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि प्रशस्त अशा अशोका हॉस्पिटलमध्ये बेड्स वेटिंगवर आहेत. भरपूर पेशंट वेटिंगवर आहेत. बुकिंग करूनच अॅडमिशनला येत आहेत सध्या सगळे पेशंट. अशीच अवस्था इतरही हॉस्पिटल्सची. महापालिकेच्या हॉस्पिटलकडून तर फोनच उचलला जात नाही.


शहरातील नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये बेड्स शिल्लक नाहीत, अनेक नंबर नॉट रिचेबल आहेत तर धक्कदायक बाब म्हणजे बेड्स बुकिंग साठी महापालिकेने जारी केलेला अधिकृत मोबाईल नंबर कधी लागत नाही आणि कधी नशिबाने लागलाच तरी तो कोणीच उचलत नाही. 


विशेष म्हणजे व्हीआयपी लोकांना कोरोनासाठी लगेच बेड्स मिळतात असे आजपर्यंत आपल्या कानी पडत होते मात्र नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांना त्यांच्या ओळखीच्या रुग्णासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही आणि अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाला. 15 रुग्णालय तसेच अनेक डॉक्टरांशी त्यांनी संपर्क साधला होता, मात्र काहीही उपयोग झाला नसून संपूर्ण जिल्ह्यातच व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. तसेच अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत असल्याचा आरोप त्यांनी केला असून महापालिकेत भाजपचीच सत्ता असतांना त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने अशाप्रकारे नाराजी व्यक्त केल्याने हा चर्चेचा विषय ठरतोय.


भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी यावर बोलताना सांगितलं की, "शहरातील या सर्व परिस्थितीमुळे नाशिकची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर गेल्याच बघायला मिळत असून पालकमंत्री भुजबळ यांनी देखील बैठकीत खाजगी रुग्णालयांचा मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना याकडे तातडीने लक्ष देऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. खाजगी रुग्णालयांनी मानवतेने वागावं, धंदा म्हणून रुग्णाकडे बघू नका असं आवाहनही त्यांनी केले आहे."


कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत असून रुग्णसंख्येत मोठी वाढ होते आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडली असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच ही सर्व उदभवलेली परिस्थिती बघता कोरोनाचे नियम पायदळी तुडवत बेफिकीरपणे वावरणाऱ्या नागरिकांनी आता तरी सतर्क होण्याची गरज आहे असं आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :