Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीच्या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील दोन जणांचाही येथे मृत्यू झाला आहे. महाराष्टातून अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी शेकडो भाविक जात असतात. या दुर्घटनेवेळी तेथे महाराष्ट्रातील अनेक भाविक उपस्थित असतील. काही भाविकांचा संपर्क झालाय तर अनेकजण बेपत्ता असल्याचे समजतेय. आतापर्यंत पुणे, अकोला, बीड  जिल्ह्यातील भाविकांची माहिती मिळाली आहे. जसजशी इतर जिल्ह्यातील माहिती मिळेल, तुम्हाला अपडेट्स देत राहू...  


पुण्यातील 14 भाविक संपर्काबाहेर; 36 नागरिक सुखरुप
पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक संपर्काबाहेर आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. या अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून दरवर्षी भाविक जातात. यावर्षी एकून 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. अपघातानंतर पुण्यातील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 50 पैकी 36 भाविकांशीच संपर्क होऊ शकला आहे. मात्र 14 नागरिकांशी अजूनही काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 


पुण्यातील दोन जणांचा मृत्यू - 
पुण्यातील धायरी येथे असणाऱ्या भोसले कुटुंबाचे देखील तीन सदस्य हे या यात्रेसाठी गेले होते. ज्यामध्ये सुनीता भोसले यांचं दुःखद निधन झालं आहे. धायरी मध्ये राहणारे महेश राजाराम भोसले,सुनिता महेश भोसले,प्रमिला प्रकाश शिंदे हे तिघे देखील बेपत्ता झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धायरी येथे भोसले कुटुंबाची भेट घेत त्यांच सांत्वन करत जिल्हा प्रशासनाशी भोसले कुटुंबाचा संपर्क देखील करून दिला आहे. पिंपरीतील मृत्यू झालेले नागरिक सुखरुप परतले होते. मात्र परतल्यावर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी जागीच प्राण सोडले, अशी माहिती अमरनाथ यात्रा आयोजक शुभम खेडेकर यांनी दिली आहे. अमरनाथ यात्रेसाठी यावर्षी पुण्यातून एकून 50 भाविक गेले होते. त्यातल्या अनेक नागरिकांशी सकाळपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता.


बीडमधील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील 11 भाविक अमरनाथ येथे अडकले, 28 सुखरुप -
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून  दिनांक पाच जुलै रोजी  39 भाविक अमरनाथ यात्रेला गेले होते. तिथे अचानक ढगफुटी झाली, पूरग्रस्त स्थिती तयार झाली. पूर्ण भारतामधून अमरनाथ (बाब बर्फानी) यात्रेसाठी दरवर्षी भाविक भक्त जात असतात, यावर्षी ही आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून 39 भाविक भक्त गेले होते, त्यातील 28 भविक भक्त  बालटल येथे सुखरूप खाली आले आहेत. तर 11 जन वरतीच अडकले आहेत, तरी त्यांना  एन डी आर एफ  जवान आणि भारतीय लष्कराच्या मदतीने सुरक्षित स्थळे आणण्याचे  काम प्रगती पथावर  चालू आहे.


अकोल्यातील 47 यात्रेकरुंशी संपर्क - 
अकोल्यातून अमरनाथ यात्रेकरिता गेलेल्या 18 यात्रेकरूंचा गट सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाशी आतापर्यंत 47 यात्रेकरूनी संपर्क केला आहे. यातील 29 यात्रेकरू अकोटचे आणि अकोल्यातील 18 यात्रेकरूंचा गट अमरनाथ यात्रा न करताच पहलगामवरून वैष्णोदेवीकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.


अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या सांगलीतील भाविकांचा उत्साह कायम...  
अमरनाथ मध्ये शुक्रवारी  ढगफुटी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतरही अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यां भाविकांचा उत्साह कायम दिसून येत आहे.  सांगलीतून मोठया संख्येने भाविक शनिवारी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालेत. भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी  उर्फ पप्पू डोंगरे यांच्या सहकार्यातून हे भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत.  यंदा जिल्हाभरातून जवळपास दोन हजार भाविक अमरनाथ यात्रेसाठी जात आहेत. मागील 14  वर्षांपासून शिवाजी  उर्फ पप्पू डोंगरे हे स्वतःच्या खर्चातून  माधवनगर, सांगली भागांतील नागरिकांना अमरनाथ यात्रेचे दर्शन घडवले आहे. कोरोनामुळे मागे दोन वर्षांमध्ये अमरनाथ यात्रा होऊ शकली नव्हती.  त्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर संख्या दिसून येत आहे.