मनमाड : प्राण्यांना जीव लावल्यावर ते आपल्यासाठी जीवही देऊ शकतात हे आपण काही चित्रपटांमधून पाहिलं असेल. मात्र अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अंबासन येथे ही घटना घडली आहे. अंबासन येथील सचिन मोकासरे या शेतकऱ्याच्या पाळीव 'ज्युली' नामक कुत्रीने विषारी कोब्राशी झुंज देऊन शेतकऱ्याचे प्राण वाचवले आहेत. विषारी सर्पाशी झुंज देतांना सर्पाच्या दंशात 'ज्युली'चाही दुर्देवी मृत्यू झाला आहे. या झटापटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
माहितीनुसार, दुपारी 1 वाजेच्या दरम्यान शेतातील घराजवळ लहान मुले आणि 'ज्युली' नामक कुत्री खेळत होते. अचानक झुडपातून कोब्रा जातीच्या सापाने मुलांकडे चाल केली. सापाला पाहून 'ज्युली' क्षणात धाव घेऊन सापाला आडवी झाली. सापाने फुत्कार करत 'ज्युली'वर अटॅक केला. 'ज्युली'नेही सापाचे लचके तोडायला सुरुवात केली. दोघांची झटापट सुरू झाली हे बघून खेळत असलेली लहान मुल ओरडत घराकडे पळाली.
मुलांचा आरडाओरडा आणि झटापटीचा आवाज आल्याने आवाजाच्या दिशेने पळत जाऊन मालकाने पाहिले असता 'ज्युली'ने सापाला तोंडात धरले होते. 20 ते 25 मिनिट चाललेल्या झटापटीत सापाने 'ज्युली'ला अनेक ठिकाणी दंश केला होता. अखेर हा साप मेल्यावरच झुंज थांबली. त्यानंतर 20 मिनिटांत 'ज्युली'चा देखील अंत झाला. ज्युलीच्या मृत्युने मोकासरे परिवारासह गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.