मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून कोकण किनारपट्टी, मुंबई आणि मराठवाड्याला झोडपणारा पाऊस सप्टेंबरपर्यंत सुरुच राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शिवाय कोकण, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुसळधार पावसाने मराठवाडा चिंब

गेल्या काही दिवसांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्याला अखेर परतीच्या पावसाने चिंब भिजवून टाकलं आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी अशा सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने तूट भरुन काढली आहे.

लातूरमध्ये औराद आणि अबुलगा या भागात पावसाने कहर केला आहे. यामुळे शेताला नदी-नाल्याचं स्वरुप आलं आहे. पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत. मूग, सोयाबीन, उडीद पीक भुईसपाट झालं आहे. संपूर्ण जिल्ह्यातील 4 लाख हेक्टर वरची पिकं धोक्यात आली आहेत.

तिकडे नांदेडमध्ये 91 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदेड शहराची तहान भागवणारी गोदावरी नदी चार वर्षांनी पहिल्यांदाच दुथडी भरुन वाहत आहे. विष्णुपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. यामधून 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तसंच देगलूर तालुक्यातला करडखेड प्रकल्प पूर्णपणे भरला आहे.

याशिवाय कोरड्या बीडलाही पावसाने ओथंबून टाकलं आहे. गेल्या चार वर्षात प्रथमच इतका मोठा पाऊस बीडकरांनी अनुभवला. बिंदुसरा नदीला पहिल्यांदाच पूर आल्याने दगडी पुलावरुन जाणाऱ्या जुन्या बीडचा संपर्क तुटला आहे. 4 वर्षात पहिल्यांदाच तब्बल 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील अनेक बंधारे, नदी नाल्या तुडुंब भरले आहेत. बीड जिल्ह्यातील 19 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाने झोडपलं

कोकणात जोरदार बरसणाऱ्या पावसाने गेल्या 48 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना अक्षरश: झोडपलं. एकट्या खेड तालुक्यात काही तासांमध्येच 300 मिमी पाऊस झाल्याने खेडमध्ये पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं.

दुसरीकडे जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा वाहतूक ठप्प झाली होती. पण आज सकाळी पाणी ओसरल्याने खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरु झाली. मात्र मुसळधार पावसाने जगबुडी नदीवरच्या पुलाचे कठडे मात्र खिळखिळे झाले आहे.

तसंच पोलादपूरच्या घाटात आणि परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. पण नंतर दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान पुढच्या काही तासांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. शिवाय मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे.