नरेंद्र पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. परंतु सध्या ते भाजपमध्ये आहेत. आज पाटील यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यात नरेंद्र पाटलांनी उदयनराजे भोसले यांचे राजकीय विरोधक असलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. एका हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी हे दोघे भेटले असल्याचे पाटलांनी सांगितले. हॉटेलमध्ये पाटील आणि भोसले या दोघांमध्ये बराच वेळ राजकीय विषयांवर बातचीत झाली. या दोघांच्या भेटीने राष्ट्रवादीच्या गोटात मात्र शांतता पसरली आहे.
आज नरेंद्र पाटलांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी पाटील यांनी साताऱ्यात उदयनराजेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. गेल्या 10 वर्षात साताऱ्याचा विकास रखडला असल्याची खंत पाटलांनी यावेळी व्यक्त केली. मतदारांनी संधी दिल्यास भाजप साताऱ्याचा विकास नक्की करेल, असा विश्वास पाटलांनी यावेळी व्यक्त केला.