मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने दोघांना अटक केली आहे. सनातनचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला मुंबईतून करण्यात आलं आहे. हत्येचा कटात सहभागी होणे आणि हत्येनंतर पुरावे नष्ट केल्याचे आरोप दोघांवर आहेत.
संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे तीन आरोप आहेत. तर विक्रम भावे याच्यावर नरेंद्र दाभोलकर कोण आहेत हे दाखवणे, दाभोलकर कोण होते याची माहिती देणे आणि कटात सहभागी असणे हे तीन आरोप आहेत.
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल नष्ट करण्यासाठी मदत केली होती. त्याचबरोबर हत्येवेळी दाभोलकरांची ओळख पटवण्यात विक्रम भावेचा सहभाग होता.
संजीव पुनाळेकर दाभोलकर आणि पानसरे हत्याप्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींचे वकीलपत्र घेऊन न्यायालयात बाजू मांडत आहेत. तसेच पुनाळेकर या प्रकरणातील फरार आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय सीबीआयला आहे.
विक्रम भावेला 2008 मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतनजवळ झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जामिनावर सुटल्यावर तो वकील संजीव पुनाळेकरला मदत करत होता. पुनाळेकरने शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला मुंबईतील खाडी पुलावरुन शस्त्र फेकून देऊन नष्ट करण्याची सूचना केली, त्यावेळी विक्रम भावे तेथे हजर होता. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना उद्या दुपारी पुण्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
VIDEO | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी 'सनातन'चे वकील संजीव पुनाळेकरसह दोघांना अटक | ABP Majha
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला एटीएसनं अटक करण्यात आली होती. दोघांच्या चौकशीत एटीएसला पुण्यातील डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाचे धागेदोरे सापडले. त्यानंतर दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर अंदुरे आणि कळसकर हेच दोघे असल्याची कबुली खुद्द आरोपींनी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या दोघांचा ताबा सीबीआयनं घेतला आणि त्यांच्याविरोधात तपास सुरू केला.
संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या अटकेचा 'सनातन'कडून निषेध
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना केलेली अटक निषेधार्ह आहे. केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असताना अधिवक्ता पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक होणे, यामागे षडयंत्र आहे. सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे.
मालेगाव स्फोट प्रकरणी भगवा आतंकवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला, ज्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक याचिका केल्या, त्या अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांची निरपेक्षपणे सेवा करणारे अधिवक्ता पुनाळेकर निर्दोष आहेत, ही आमची भावना आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांना देशभरातील समाजसेवक, देशभक्त आणि हिंदुत्ववादी संघटना, तसेच अधिवक्ते यांनी पाठिंबा कळवला आहे.
VIDEO | स्पेशल रिपोर्ट : पुणे : डॉ. दाभोलकर हत्या, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?