मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला. लोकसभा गमावल्यानंतर खैरेंचे राज्यात पुनर्वसन केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत खैरेंची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत खैरेंना राज्यात एखादे मंत्रीपद देण्याचे उद्धव यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती मिळाली आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये एमआयएमला रोखण्यासाठी शिवसेनेकडून हे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे.

चंद्रकांत खैरे हे मातोश्रीच्या विश्वासातले मानले जातात. लोकसभा निवडणुकीत खैरै जिंकून आले असते तर ते राज्यमंत्रीपदाचे ते दावेदार होते. परंतु पराभव झाल्याने त्यांचे स्वप्न भगले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत खैरेदेखील दिसण्याची शक्यता आहे.

VIDEO | जावयासाठी रावसाहेब दानवेंनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला? | औरंगाबाद | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 2014 प्रमाणे 18 खासदार जरी आले असले तरी यंदा शिवसेनेच्या 4 मातब्बर नेत्यांचा पराभव झाला आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील हे शिरुरमधून पराभूत झाले. खैरे औरंगाबादमधून पराभूत झाले, केंद्रीय मंत्री अनंत गीते रायगडमधून पराभूत झाले तर आनंदराव अडसूळ यांचा अमरावती मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यामुळे या जेष्ठ नेत्यांचे काय करायचे असा प्रश्न समोर असताना खैरेंचे राज्यात पुर्नवर्सन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हिडिओ पाहा



औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा 5 हजार 25 मतांनी पराभव केला. खैरे आणि जलील यांच्यात शेवटपर्यंत चुरस पहायला मिळाली होती. शिवसेनेतील बंडखोर नेते हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंचा औरंगाबादमध्ये पराभव झाला असल्याचे बोलले जात आहे.