नारायण राणे आणि अमित शहा यांची भेट गुप्त होती. पण ही गुप्त भेट सार्वजनिक झाल्यानं भाजपत गोंधळ सुरु आहे. भाजपमध्ये एक मोठा दबावगट राणेंविरुद्ध तयार झाला आहे. त्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश आता काही दिवस तरी होल्डवर ठेवण्यात आला आहे.
सुरुवातीला नारायण राणेंचा भाजप प्रवेश सुकर मानला जात होता पण गुप्त भेटीची बातमी फुटल्यानं त्यांच्या पक्ष प्रवेश अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अमित शहाच घेणार राणेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल अंतिम निर्णय
भाजपत राणेंना प्रवेश मिळू नये यासाठी राज्यातील भाजपमध्ये एक दबाव गट तयार झाला आहे. यामध्ये काही ज्येष्ठ नेत्यांचाही विरोध असल्याची माहिती समजते आहे. त्यामुळे आता राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीतील तपशील अमित शहांना कळवण्यात येईल. पण राणेंना पक्षात घ्यायचं की नाही, यांचा अंतिम निर्णय अमित शहा हेच घेतील.
गुप्त भेट उघड झाल्यानं राणेंच्या अडचणीत वाढ?
भाजपकडून पक्ष प्रवेश होल्डवर गेल्यामुळे नारायण राणेंची मात्र बरीच अडचण झाल्याचं बोललं जात आहे. राणेंची अहमदाबादमधील भेट उघड झाल्यानं काँग्रेसमध्ये त्यांच्याविरोधात अविश्वास वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, आजपासून सुरु झालेल्या संघर्षयात्रेतही ते सहभागी झाले नव्हते. तर दुसरीकडे भाजपमध्ये त्यांच्याविरोधात दबाब गट तयार झाला आहे. त्यामुळे आता नारायण राणे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
‘ती’ भेट गुप्तच राहिली असती तर?
जर ही भेट गुप्त राहिली असती तर नारायण राणे स्वत:च्या अटींवर भाजपमध्ये प्रवेश करु शकले असते. पण भेटीची बातमी जगजाहीर झाल्यानं त्यांना भाजपच्या अटींवर प्रवेश करावा लागण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
दस्तुरखुद्द नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. महत्त्वाचं म्हणजे याच गाडीत पुढच्या सीटवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणेही असल्याचं दिसत होतं. ‘माझा’च्या हाती लागलेल्या दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसललेले स्पष्ट दिसत होते. तर नितेश राणे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला पाहायला मिळत होते.
“मी काल अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही,” असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्याचं वृत्त फेटाळलं होतं.
संबंधित बातम्या:
राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?