मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची पासष्ठी मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडली. मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच. तेव्हा बाळासाहेबांनी जो विश्वास टाकला तो कोणताच नेता टाकणार नाही. मी कोणत्याही पक्षात असलो किंवा गेलो तरी बाळासाहेबांचं स्थान अढळ आहे, अशा शब्दात राणेंनी कृतज्ञता व्यक्त केली.


विशेष म्हणजे फक्त काँग्रेसच नव्हे, तर भाजप, राष्ट्रवादी यासारख्या पक्षातूनही दिग्गज नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, रामराजे निंबाळकर, भाजप नेते नितीन गडकरी, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थिती लावली.

नारायण राणे महाराष्ट्राला दिसतोय तो केवळ बाळासाहेबांमुळे : नारायण राणे

माझ्या आणि नितीन गडकरींच्या मैत्रीत पावित्र्य आहे. मी आज काँग्रेसमध्ये आहे. पण तरीही नितीन गडकरी आले. याला कारण गडकरी आणि माझी मैत्री. आज विरोधी पक्षातल्या नेत्यासोबत बसताना बोलताना जी काही घाबरगुंडी उडते, ती भीती नितीन गडकरींना वाटत नाही. आपलं पद धोक्यात घालून मैत्री निभावणं हे केवळ नितीनलाच जमतं. कोकणातल्या कार्यक्रमात मला नितीन गडकरींनी बोलावणं हे मैत्रीतूनच आलेलं, असं म्हणत नारायण राणेंनीही नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली.

विलासरावांचं सरकार आम्ही पाडत होतो, सरकार गेल्यात जमा होतं. आमच्यातल्या काहींना ते आवडलं नाही. ते त्यांनी घडु दिलं नाही. जेव्हा कळलं सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री होतील तेव्हा सरकार पाडणार नाही हे निश्चित केलं. सुशिलकुमार शिंदेंना वाटलं राणेंनी आपलं नाव सुचवलं तेव्हा विरोधी पक्षाकडून मदत होईलच पण झालं उलटं, अशा शब्दात सुशिलकुमार शिंदेंसोबतच्या आठवणी नारायण राणेंनी सांगितल्या.

मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच. तेव्हा बाळासाहेबांनी जो विश्वास टाकला तो कोणताच नेता टाकणार नाही. मी कोणत्याही पक्षात असलो किंवा गेलो तरी बाळासाहेबांचं स्थान अढळ आहे. माझ्या मनात मुंबईचा महापौर होण्याचं होतं, तेव्हा बाळासाहेबांनी मला आमदारकीचं तिकीट दिलं. नारायण राणे महाराष्ट्राला दिसतोय तो केवळ बाळासाहेबांमुळे. नाहीतर हा नोकरदार कोकणी माणूस महाराष्ट्राला कधी दिसला नसताच, अशा शब्दात राणेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

मी जे ठरवतो तेच करतो, आणि कुणालाच घाबरत नाही. कारण प्रामाणिकपणे काम केलं तर घाबरायचं कारण नाही. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्याशी जसा बोलायचो, आज सोनिया गांधी, राहुल गांधींशी तसंच बोलतो, असं राणे म्हणाले.

आज आठवण येतेय ती गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांची. नितीन गडकरींचा भविष्यकाळ फार उज्ज्वल आहे. त्यांचं वय त्यांना साथ देईल आणि काहीतरी आगळंवेगळं चित्र देशात घडवतील, असंही राणे म्हणाले.

मी जेवढी चिंता माझ्याबद्दल करत नाही, तेवढी चिंता मी कुठे जाणार याची महाराष्ट्राला, मीडियाला आज आहे, असा टोलाही त्यांनी जाताजाता लगावला.

विरोधीपक्ष नेत्याने शिवलेला ड्रेस घालून बजेट मांडलं : जयंत पाटील

'एकदा मी बरचसं वजन कमी केलं होतं. अर्थसंकल्प मांडण्यासाठी मला व्यवस्थित होणारे कपडे नव्हते. योगायोगानं राणे साहेबांना हे कळलं. माझ्याकडे माप घेणारा माणूस आला. दुसऱ्या दिवशी 11 वाजता नवा ड्रेसही शिवून आला. त्यावेळी विरोधी पक्ष नेत्यानं दिलेला सुट घालून मी अर्थसंकल्प मांडला', असा किस्सा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितला.



राणे साहेबांचा स्पष्टवक्तेपणा इतर पक्षांमध्ये मानवणारा आहे, पण ज्या पक्षात ते गेले आहेत त्या पक्षात त्यांची थोडीबहुत कुचंबणा होत असणार, अशी मिष्किल टिपणीही जयंत पाटलांनी केली.

कुठेही जा, पण रुबाब घालवू नका : रामराजे निंबाळकर

'राणे साहेब कुठेही जा, काहीही होऊ दे, रुबाब घालवू नका' असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी नारायण राणेंना दिला.

राणेंनी शिवसेना सोडली नसती, तर... : नितीन गडकरी

राणेसाहेब आणि मी दोघे मिळून विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावायचो. कोणतीही पार्श्वभूमी नसताना राणेंनी मुंबईत येऊन धडाडीनं नेतृत्व उभं केलं. राजकारणात राणेंचं व्यक्तिमत्व हे सेल्फ मेड आहे, या शब्दात भाजप नेते नितीन गडकरींनी नारायण राणेंनी स्तुतिसुमनं उधळली.

पक्ष बदलल्यानंतर माणसं रंग बदलतात. मात्र शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी कधीही बाळासाहेबांचा अनादर केला नाही. तिकडून कितीही टीका झाली तरी त्यांनी कधीही अनादर होईल असं वक्तव्य केलं नाही. शिवसेना सोडल्यानंतर हे सिद्ध झालं की राणेंचं नेतृत्व पक्षापलिकडलं आहे. जर राणे साहेबांनी शिवसेना सोडली नसती तर आजचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेनं गेलं असतं, असे उद्गार गडकरींनी काढले.



'बेस्ट मध्ये किती चेअरमन होऊन गेले मला माहित नाही. पण मुंबईत बेस्ट चेअरमन म्हणून कुणाची कारकीर्द सर्वात लक्षात राहिल तर नारायण राणेंची. बाळासाहेब मला एकदा म्हणाले होते हे नवलकर, ढाके भाजपमध्ये घेऊन जा आणि तू शिवसेनेत ये. तू भाजपच्या लायकीचा नाही आणि हे शिवसेनेच्या लायकीचे नाहीत. बाकी काहीही असो, पण बाळासाहेबांचं राणेसाहेबांवर खूप प्रेम होतं', असंही गडकरी
म्हणाले.

मी राणेंना काँग्रेसमध्ये जाताना म्हटलं होतं, की तुम्ही आगीतून सुटून फुफाट्यात जाताय. हे खरं आहे. कारण सुशिलकुमार शिंदेंना ठाऊक आहे, की हायकमांड हसली की आपल्यालाही हसावं लागतं. हा स्वभाव राणेंचा नाही, त्यांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे, कर्तृत्व, क्षमता आहे.

माणूस जेव्हा लढाईत हरतो तेव्हा तो पराभूत होत नाही पण, तो युद्धभूमी सोडून जातो तेव्हा हरतो. हे वाक्य नारायण राणेंच्या आयुष्यासाठी आहे, अशा शब्दात गडकरींनी कौतुक केलं.

राणे पराभवानं खचून जाणारे नाहीत : सुशिलकुमार शिंदे

नारायणरावांबाबत फार अफवा आहेत की ते इकडे चालले, तिकडे चालले. पण नारायण राणे द्रष्टे आहेत. विचार करुन काम करणारे आहेत. पराभवानं खचून जाणारे नाहीत. नारायण राणे हे वेडावाकडा विचार करणार नाहीत, याची मला खात्री आहे, असं काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे म्हणाले.

काँग्रेसवाले हे घुसण्यात एक्सपर्ट असतात, आणि ते कुठे घुसून कोणाला बाहेर काढतील सांगता येत नाही. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचं बारीक लक्ष असतं की एखाद्याला छळल्यानंतर, त्रास दिल्यानंतर माणूस काय करतो. राणेसाहेब या परीक्षेत यशस्वी झाले आहेत, असं शिंदे म्हणाले.



आमचा पक्ष फार मोठा आहे. एक शतक पूर्ण झालेला पक्ष आहे. नेतृत्वानं मला पूर्ण संधी दिली. आज बेस्टची परिस्थिती खालावली आहे, तेव्हा नारायण राणेंच्या बेस्ट मधील कारकीर्दीची आठवण येते, असंही ते म्हणाले.

कोकणातल्या जहाल मातीचा वास नारायण राणेंना आहे. नारायण राणेंची खासियत म्हणजे माहिती घेऊन अभ्यासपूर्ण भाषण करणं. नवीन येणारे जे तरुण आमदार आहेत त्यांनी राणेंचा आदर्श घ्यावा, असा सल्लाही सुशिलकुमार शिंदेंनी इतरांना दिला.