माझ्या घरासमोरचे रस्ते रुंद करा, गडकरींची पालिकेला कोपरखळी
एबीपी माझा वेब टीम | 09 Apr 2017 10:15 AM (IST)
नागपूर : नागपूर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला. मात्र नितीन गडकरींवर चक्क मुख्यमंत्र्यांच्या देखतच नागपूर महापालिकेच्या दिरंगाईची तक्रार करण्याची वेळ आली. महानगरपालिकेने माझ्या घरासमोर भररस्त्यात भरणारे भाजी बाजार बंद करावेत. माझ्या परिसरातील रस्ते मोठे आणि रुंद करुन द्यावे अशी विनंती नितीन गडकरींनी केली. ते नागपूर महापालिकेनं आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी शिखर परिषदेत बोलत होते. नितीन गडकरींचं घर जुन्या नागपुरात आहे. त्यांच्या घरासमोरचे रस्ते अरुंद असून तिथं बाजार भरतो. त्यामुळे महापालिकेनं हे रस्ते रुंद करुन तिथं भरणाऱ्या बाजारावर तोडगा काढावा, अशी मिश्किल तक्रार नितीन गडकरींनी केली. मुख्यमंत्र्यांसह महापौर, नागपूरचे बहुतांशी आमदार आणि नागपुरातील सर्वच मोठे अधिकारी नव्या नागपुरात राहतात. मात्र मी जुन्या नागपुरात राहतो. त्यामुळे महानगरपालिकेने जुन्या नागपूरकडेही थोडे लक्ष द्यावे, अशी कोपरखळी गडकरींनी मारली.