मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर आता नारायण राणे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर राणेंनी महाराष्ट्रातल्या विविध भागांचा दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार ते तीन दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

8, 9, 10 डिसेंबर असा हा तीन दिवसांचा दौरा असेल. यात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. नवीन पक्षाची स्थापना झाल्यानंतर आणि एनडीएला पाठिंबा जाहीर केल्यानंतर नारायण राणेंना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल अशी आशा होती. पण ती फोल ठरली. त्यामुळे सध्या राणे नवनिर्वाचित पक्षाच्या सक्षम उभारणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं दिसतं आहे. त्याची सुरुवात राणे पश्चिम महाराष्ट्रातून करणार आहेत.

शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर भाजपने नारायण राणेंचा पत्ता कट केला आणि प्रसाद लाड यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली. नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी येत्या 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे.

या जागेसाठी नारायण राणेंसह भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, शायना एनसी यांच्या नावाची चर्चा होती. पण प्रसाद लाड यांनी ऐनवेळी बाजी मारत या तिघांनाही मागे टाकलं.

संबंधित बातम्या :

नितेश राणेंची 'चेहराफेरी', व्हिडिओतून उद्धव ठाकरेंना चिमटे

निष्ठावंत माधव भांडारींऐवजी ‘लाड’ यांना उमेदवारीचा ‘प्रसाद’ का?


संपूर्ण घटनाक्रम : … आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!


विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी