मुंबई/नवी दिल्ली“सुरुवात चांगली झालीय, पुढे लढत राहा, न्याय नक्की मिळेल, तुमची वेदना हीच शक्ती समजा आणि लढा द्या, असंच मी कोपर्डीच्या निर्भयाच्या पालकांना सांगू इच्छिते ” असं दिल्लीतील निर्भयाच्या आईने म्हटलं आहे.


कोपर्डी निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एबीपी माझाशी बातचीत केली.

"दिल्लीतील निर्भयावरील बलात्कार-हत्येचा घटनेला पाच वर्ष झाली, मात्र आरोपी अजूनही जिवंत आहेत. त्यांच्या फाशीची अंमलबजावणी झालेली नाही. कोपर्डी बलात्कार हत्या प्रकरणात तर केवळ एकाच कोर्टाने फाशीची शिक्षा दिली आहे. सध्या ती पण थोडी नाही, अजून मोठी लढाई लढायची आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक वर्ष निघून जातात", असं म्हणत दिल्लीतील निर्भयाच्या आईने हतबलता व्यक्त केली.

याशिवाय, “आमच्यासारख्या अनेक पीडिता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, कोपर्डीप्रकरणीही पीडितेंना न्याय मिळेल, मात्र अजूनही मोठी लढाई आहे. न्यायालयीन प्रक्रिया मोठी आहे, आता फक्त एकाच कोर्टात फाशी मिळाली. आपली व्यवस्था अशा खटल्यातही इतका वेळ घेते ही दु:खद आणि निराशजनक बाब आहे”, असं निर्भयाची आई म्हणाली.

अशा घटनांमध्ये वेदना देणारी गोष्ट म्हणजे, शिक्षेची वेळ येते तेव्हा कायदे-नियम पाहिले जातात, पण आरोपींना वाचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. आरोपीचं वय पाहिलं जातं. कायदा आहे तर शिक्षा तातडीने का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना दुर्दैवी, चुकीच्या आहेत, असं कोणताही मंत्री, राजकीय नेता म्हणाला नाही. कायदा आहे तर दोषींना लवकर शिक्षा का होत नाही? दोष कायम मुलीलाच दिला जातो, ती रात्री घराबाहेर का गेली होती? छोटे कपडे का घातले होते? पण आरोपींना कोणी विचारत नाही की तू तिथे काय करत होतास? सरकार आणि सिस्टम जोपर्यंत ठोस पावलं उचणार नाही, तोपर्यंत देशातल्या मुली सुरक्षित नाहीत, असंही निर्भयाची आई म्हणाली.

निर्भयाचे मारेकरी अजूनही जिवंत

आमच्या मुलीच्या मारेकऱ्यांना फाशी झाली, मात्र 5 वर्षे झाली तरी आरोपी जिवंत आहेत, अजून फाशीची अंमलबजावणी झालेली नाही. दोषींकडे वाचण्यासाठी पर्याय आहेत, पण आमच्याकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही, पाच वर्ष झाली ते नराधम अजून जिवंत आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश येऊन सहा महिने झाले आहेत, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.