Narayan Rane : नारायण राणे आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष पुन्हा शिगेला पोहोचलेला असताना मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी राणेंना अटक होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच आज संभाव्य अटकेबाबात नारायण राणे यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझं वक्तव्य हे गुन्हा नोंदवण्याचं वक्तव्य नाही, कोणत्याही गुन्ह्याची मला कल्पना नाही, त्यामुळे ऐकीव माहितीवर मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर गुन्हा का दाखल होत नाही, असा प्रतिसवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमचंही सरकार केंद्रात आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुयात, असाही सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. 


नारायण राणे बोलताना म्हणाले की, "माहितीच्या आधारे मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झाला याची मला माहिती नाही, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा आणि मग आपापल्या टिव्हीवर दाखवा. नाहीतर माझी केस दाखल होईल तुमच्याविरोधात. गुन्हा नसताना पथक निघालाय, अटक होणार असं दाखवलं जात आहे. काय नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला? उगाच कोणाचंही नाव सांगता, शिवसेना... कोण शिवसेना? एखाद्याचं नाव सांगा, नेत्याचं नाव सांगा. कोण बडगुजर मी ओळखत नाही. माध्यमांनी जर माझी बदनामी करायला घेतली, तर माझ्याकडून माध्यमांवर गुन्हा दाखल केला जाईल. मी माध्यमांच्या बातम्यांवर, सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही समर्थ आहोत. दो दगड मारून गेले, पुरुषार्थ नाही. जे काही करायचंय ते करु देत, आम्ही पाहू त्याला."


"जेव्हा प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर वक्तव्य केलं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर गुन्हा का दाखल होत नाही? त्याचं माध्यमांनीही का नाही दिवस-रात्र दाखवलं? 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन मुख्यमंत्री असतानाही त्यांना माहीत नाही, त्यावेळी मी असतो तर... असं म्हणालो होतो. असतो तर... हा क्राईम होत नाही. मी जर आता कानफाडात फोडीन असं म्हणालो असतो, तर हा क्राईम झाला असता. जरा समजून घ्या.", असं म्हणत नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिलं. 


"मी अशा शिवसैनिकांना भीक घालत नाही. कोण आहेत ते… समोर उभं तरी राहावं. पोलिसांनी पत्र दिलं नसून नोटीस दिली आहे, त्यात फरक आहे. आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे की, पंतप्रधान आहे? मी जे बोललो तो गुन्हा नाही. तपासून पाहावं.", असं नारायण राणे म्हणाले. 


काय म्हणाले होते नारायण राणे? 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Narayan Rane : नारायण राणेंना अटक होणार? मुख्यमंत्र्यांबाबतच्या चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी अटक करण्याचे नाशिक पोलिसांचे आदेश