सिंधुदुर्ग : राज्यातील शेतकरी बांधव आक्रमक झाले असताना, विविध पक्षांकडून शेतकरी संपाला पाठिंबा दिला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही शेतकरी संपाला पाठिंबा देत, राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.


“शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नाही. चांगला दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा कोणीही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नये. मी शेतकऱ्यांच्या बाजूचा राहीन.”, असे नारायण राणे म्हणाले. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. राणे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेऊ असे सांगितले. पण निर्णय घेतलेला नाही. कॅबिनेट घेतलेली नाही. जीआर काढलेला नाही. जेव्हा जीआर काढतील तेव्हा खरी मदत मिळेल. पण खरा अडचणीत असलेला शेतकरी याने समाधानी होणार नाही. जर 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, तर ती खरी कर्जमाफी असेल.”

शेतकरी संपावर....

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र करत महाराष्ट्र बंद ठेवला आहे. या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. शिवाय या बंदला अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.

संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.

  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.

  • शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.

  • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी.