मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आज मुंबईपासून सुरुवात झाली. या जन आशीर्वाद यात्रेला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या यात्रेला सुरुवात झाली. या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईतील भाजपचे सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. एक प्रकारे मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली असल्याची चर्चा सुरू आहे.
नारायण राणे यांना शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आम्ही नारायण राणे यांना विरोध करू अशी भूमिका शिवसैनिकांनी सुरवातीला घेतली होती. मात्र या भूमिकेत बदल करत आमचा विरोध नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा सर्वांना अधिकार असल्याची भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली. यावरून ही नारायण राणे यांनी शिवसेनेवर मोठ्या प्रमाणावर टीका केली. आम्हाला अडवण्यासाठी आता शिवसेनेत कोणी शिल्लक तर पाहिजे, असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.
गेली 32 वर्षांपासून शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे. मात्र अजूनही मुंबईकरांच्या जीवनात काही बदल झालेले नाहीत. नेते नवीन आले मात्र तीच परिस्थिती आणि तीच लोक पाहायला मिळतात. त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता घालवा आणि भाजपची सत्ता आणा अस आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. मी मुंबईमध्ये परिवर्तन करून दाखवतो. कारण मुंबईकरांचा विकास झाला नाही मात्र मातोश्रीचा विकास झाला. मातोश्रीमध्ये एकाचे दोन बंगले तयार झाले असल्याची टीका ही राणे यांनी केली.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई म्हणून छाती फुगून सांगता. पण मराठी माणसाचं त्यात काय आहे. परप्रांतीयांसारखं झालं पाहिजे पण पण त्यांना बाहेर काढून होऊ नका तर पैसे कमवून मोठे व्हा असं नारायण राणे यांनी म्हटल आहे. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सत्तापरिवर्तन करायच आहे आणि त्यासाठी मी स्वतः संपूर्ण मुंबईभर फिरणार असल्याचही यावेळी राणे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांची जन आशीर्वाद यात्रा कोकणामध्ये जाणार आहे. त्याच्या आधीच हीच जन आशीर्वाद यात्रा संपूर्ण मुंबई पिंजून काढणार आहे. त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने तयारीला सुरुवात केली असून सत्ताधारी शिवसेनेच्या समोर थेट नारायण राणे यांचं आव्हान भाजप पुढे करू पाहत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत शिवसेना विरुद्ध भाजप कडून नारायण राणे यांचा चेहरा पाहायला मिळणार आहे.