मुंबई : भाजपचा प्रस्ताव आलेला आहे. पण यासंबंधीत अजून काहीही मत जाहीर केलेलं नाही, असं स्पष्टीकरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत दिलं.


जे राणेंना घेऊ नये बोलतात तेच ऑफर घेऊन येतात, राज्यात एकही पक्ष नाही की तो राणेंना घ्यायला तयार नाही, सर्व जण राणेंना पक्षात घ्यायला तयार आहेत, असंही राणेंनी सांगितलं.

''अहमद पटेलांनी भेट नाकारली ही अफवा''

दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना अहमद पटेलांसोबत भेटलो. अहमद पटेलांनी भेट नाकारली ही चर्चा खोटी आहे. मी दिल्लीला वेळ दिल्याशिवाय जातच नाही, असं स्पष्टीकरणही राणेंनी दिलं.

काँग्रेसकडून नाराजीचं कारण विचारलं जातं. राज्यात काँग्रेसचं कामच नाही. सगळ्या निवडणुकात पराभव होतोय, त्यासाठी प्रयत्नही केले जात नाहीत. कार्यकर्ते हताश झाले आहेत. त्यांना ताकद देण्याचं कामही काँग्रेसकडून केलं जात नाही, असा घणाघात राणेंनी केला.

संघर्षयात्रेवर सडकून टीका

संघर्ष चाललाय बोलतात. कुणाविरोधात संघर्ष करताय ते पण सांगत नाहीत. मला कोकणातील संघर्षयात्रेचं नेतृत्व करण्याबाबत अद्याप काहीही सांगितलेलं नाही. संघर्षच होत नाही तिथे मी का नेतृत्व करु, शेतकऱ्यांच्या हिताचा संघर्ष होणार असेल तर मी तयार आहे, पण शेतकऱ्यांनी काय प्रतिसाद दिला ते सर्वांना माहित आहे. बजेट आणि सभागृह सोडून संघर्षयात्रा काढली. मी राहुल गांधींनाही याबाबत कळवलं आहे. संघर्षयात्रेतून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलं नाही, असंही राणे म्हणाले.

''शिवसेनेचे 17 आमदार बाहेर पडायला तयार''

दरम्यान नारायण राणेंनी शिवसेनेवरही सडकून टीका केली. शिवसेनेने पक्ष बांधणीसाठी शिवसंपर्क अभियान सुरु केलं आहे. पण शेतकऱ्यांसाठी असल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरेच नाही, त्यांचे कोणीही नेते बोलतात त्यात दखल घेण्यासारखं काहीही नाही, असा घणाघात राणेंनी केली.

शिवसेनेचे नेते काहीही झालं तरी दुसऱ्यावर आरोप ढकलतात. ऑफिसच्या क्लर्कवर केस दाखल करतात, असं म्हणत राणेंनी शिवसेने नेते रामदास कदम यांच्यावरही निशाणा साधला.

(प्रश्न : राणे भाजपात प्रवेश करतील तेव्हा शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशी चर्चा आहे)

शिवसेना बाहेर पडली तरी शिवसेनेचे आमदार सत्तेत राहतील, कोणत्या मार्गाने ते कळेल तुम्हाला त्यावेळेला, म्हणून तर हे बाहेर पडत नाहीत. त्यांच्यातले 17 आमदार कुठल्याही क्षणी बाहेर पडायला तयार आहेत. ते आत्ताच सांगणार नाही, सांगितलं तर सावध होतील, असा गौप्यस्फोटही राणेंनी केला.

पाहा व्हिडिओ :