मुंबई : राज्य सरकारला आया-बहिणींचं संरक्षण करावं लागेल. ही विनंती नाही, ते त्यांचं कर्तव्य आहे. हे जर तुम्हाला जमत नसेल, तर राजीनामा द्या, असा घणाघात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदेत केला.

 

नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी विधीमंडळात चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत आधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, मग नारायण राणे यांनी सरकारवर हल्ला चढवला.

 

मुख्यमंत्री मातोश्रीवर जेवायला जाऊ शकतात, विठ्ठलच्या दर्शनाला जातात, दिल्लीलाही जातात, मग नगर काय पाकिस्तानमध्ये आहे का?  असा सवाल नारायण राणेंनी केला.

 

जे नागपूर सांभाळू शकत नाही, ते महाराष्ट्र काय सांभाळणार

नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला. राज्यातील गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वाधिक गुन्हा नागपूरमध्ये घडत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मेव्हण्याच्या घरी चोरी झाली. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाजूला खून होतो. जो माणूस नागपूर सांभाळू शकत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळणार, असा घणाघात राणेंनी केला.

 

भाजप गुंडांचा पक्ष

भाजप हा गुंडांचा पक्ष आहे. जळगाव, नागपूरचे सर्व गुंड भाजपत दाखल झाले आहेत. जर सर्व्हे केला तर हे सिद्ध होईल. सर्व गुन्हेगार बीजेपीचे कार्यकर्ते आहेत आहेत. उद्या दाऊद म्हणाला मुंबईत येऊन सरेंडर होतो, तर तो भाजपमध्ये प्रवेश करेल, असा टोला राणेंनी लगावला.

 

नारायण राणेंच्या भाषणातील मुद्दे

मुख्यमंत्री जेवायला जाऊ शकतात, विठ्ठलच्या दर्शनाला जातात, दिल्लीलाही जातात मग नगर काय पाकिस्तान मध्ये आहे का? - नारायण राणे

- करावं लागेल आमचं संरक्षण ... नाही तर राजीनामे देऊन बाजूला व्हा...आज महिला अत्याचाराचे 20 हजारांपर्यंतचे गुन्हे आहेत.

- राज्यातली कायदा सुव्यवस्था कशी सुधारणार आहात हे सांगा.

- नागपूरात जेवढे गुन्हे झाले तेवढे महाराष्ट्रात नाही झाले. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाजूला खून होतो. नितिन गडकरींच्या मेव्हण्याच्या घरी चोरी होते. काय चाललय? नागपूर नाही सांभाळू शकत तर महाराष्ट्र काय सांभाळणार...

- सर्व गुन्हेगार बीजेपीचे कार्यकर्ते आहेत. उद्या दाऊद म्हणाला मुंबईत येऊन सरेंडर होतो. तर तो भाजपमध्ये प्रवेश करेल.

- राज्य सरकारने  सर्व्हे करावा. तेव्हा कळेल सर्व गुंड भाजप पक्षातले आहेत.

- आमदारांनी सभागृहात बोलायच नाही. नाही तर ईडी मागे लावू,  अॅंटी करप्शन मागे लावू ही गुंडांची तिसरी कॅटेगरी आहे. विरोधी पक्ष संपवण्याचं काम सुरू आहे