नंदुरबार : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील धबधब्याच्या पाण्यात अनिकेत यांचा बुडून मृत्यू झाला. तर अनिकेत यांना वाचवण्यासाठी गेलेला एक सहकाऱ्याच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे.
अनिकेत ओव्हाळ हे अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते करते. विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक कामासाठी तसंच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी अनिकेत आपल्या अन्य सहकाऱ्यासोबत धडगाव तालुक्यात आले होते. यानंतर मित्रांसह ते बिलगाव गावात धबधबा पाहण्यासाठी गेले. यावेळी ते पाण्यात उतरले असता त्यांचा पाय घसरला. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले
ही बाब लक्षात येताच अनिकेत यांचे मित्र विराज ठाकरे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तेही बुडायला लागले. त्यांना बाहेर काढण्यात आलं. पण अनिकेत ओव्हाळ यांचा मात्र बुडून मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
अनिकेत ओव्हाळ यांची दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सचिव पदावरुन राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली होती. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील अभाविपच्या आंदोलनात ते सक्रिय होते. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.