जगातील पहिला उडता वायरलेस रोबो, नांदेडच्या तरुणाचं यश
एबीपी माझा वेब टीम | 23 May 2018 11:48 AM (IST)
योगेश चुकेवाड अमेरिकेत संशोधक म्हणून काम करतात. या रोबोचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन 190 मिलिग्राम आहे.
नांदेड/वॉशिंग्टन : युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातल्या पहिल्या, सर्वात लहान, वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा शोध लावण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्या शोधामध्ये महाराष्ट्राचं कनेक्शन आहे. मूळचे नांदेडचे असलेले संशोधक योगेश चुकेवाड आणि त्यांच्या टीमने हा शोध लावला आहे. योगेश चुकेवाड अमेरिकेत संशोधक म्हणून काम करतात. या रोबोचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन 190 मिलिग्राम आहे. अमेरिकेतल्या किरो 7 या वाहिनीवरुन सोमवारी (21 मे) या उडत्या रोबोचं प्रक्षेपण करण्यात आलं. तर ब्रिस्बेनमधल्या कॉन्फरन्समध्ये योगेश चुकेवाड आज (23 मे) हा शोध सादर करणार आहेत. रोबोफ्लाय कसा काम करतो? सर्किटवरचा मायक्रोकंट्रोलर हा या रोबोच्या मेंदूसारखा आहे. कुठला पंख किती वेगात फडफडायचा याचा संदेश तो देतो. अवघड मार्गातून आपली वाट शोधण्याची क्षमता रोबोफ्लायमध्ये असावा असा आमचा प्रयत्न आहे. वायू गळती आणि पिकांची देखभाल करण्यासाठी होईल, असं संशोधक योगेश चुकेवाड यांनी सांगितलं. कोण आहेत योगेश चुकेवाड? योगेश चुकेवाड हे ज्येष्ठ बालसाहित्यिक माधव चुकेवाड यांचे चिरंजीव आहेत. योगेश यांचं शिक्षण नांदेडच्या महात्मा फुले विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी आयआयटी मुंबईतून बी. टेक केलं तर अमेरिकेत एम. एस. पूर्ण केलं. आता ते युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये पीएच.डी करत आहेत.